गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांच्या तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र इन्स्पेक्टर असेल, अशी घोषणा मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केली आहे. याशिवाय मुंबईकरांसाठी सिटीझन फोरम स्थापन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
संजय पांडे यांनी फेसबुक लाइव्ह करत याबाबतची घोषणा केली. मुंबईतील घाटकोपर येथील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी पोलीस स्टेशनला संस्थेच्या अध्यक्षाविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. घाटकोपरमधील म्हाडाच्या गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने बैठकीच्या इतिवृत्तात फेरफार केल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने इतिवृत्तामध्ये फेरफार करत रहिवाशांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याची ही तक्रार आहे. याप्रकरणी घाटकोपरमधील पोलीस ठाण्यात रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिटीझन फोरमची निर्मिती
सिटीझन फोरमची एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. mumbaicf.in अशी वेबसाइट असून त्याला भेट देऊन मुंबईकरांनी आपल्या सूचना कळवाव्यात, असे संजय पांडे म्हणाले. संजय पांडे यांनी सिटीझन फोरमची पहिली बैठक १८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ या काळात होईल, असे जाहीर केले असून पहिली बैठक मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात होईल. पुढील बैठका सिटीझन फोरमच्या सदस्यांनी घ्याव्यात, असे ते म्हणाले.