'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

रेल्वेचे तिकीट तपासनीस होणार हायटेक; टीसी आणि प्रवाशांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद करणार

प्रवाशांना टीसीने पकडल्यावर दोघांमध्ये नेहमीच बाचाबाची किंवा हमरीतुमरी घडते. प्रवासी टीसीवर गैरवर्तणुकीचा आरोप करतात, तर टीसी प्रवाशांवर अरेरावी करत असल्याचे सांगतात.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/ मुंबई

प्रवाशांना टीसीने पकडल्यावर दोघांमध्ये नेहमीच बाचाबाची किंवा हमरीतुमरी घडते. प्रवासी टीसीवर गैरवर्तणुकीचा आरोप करतात, तर टीसी प्रवाशांवर अरेरावी करत असल्याचे सांगतात. या सर्व वादावर रेल्वेने आता टीसीना हायटेक करण्याचे ठरवले आहे. प्रवासी व टीसीतील होणारे संभाषण आता टिपले जाणार आहे. त्यासाठी टीसींसाठी खास अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज वेशभूषा तयार केली आहे.

तिकीट तपासनीस कर्मचारी आणि प्रवासी यांच्यातील वाद रेकॉर्ड केलेल्या पुराव्यांद्वारे सोडवण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभाग टीसींवर ‘बॉडी-वॉर्न’ कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर वापरणार आहे. तिकीट तपासणीदरम्यान होणारे वाद, बाचाबाची आणि हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवला जात असून, यामुळे टीसी आणि प्रवाशांमधील संपूर्ण संवाद रेकॉर्डवर येईल. या प्रायोगिक प्रकल्पांतर्गत १५ बॉडी कॅमेरे आणि ३० विशेष डिझाइन केलेले जॅकेट्स खरेदी केले जातील, ज्यामध्ये एसी लोकल गाड्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल.

हे कॅमेरे तिकीट तपासणीदरम्यान काय घडते, विशेषतः जेव्हा एखाद्या संवादाचे रूपांतर वादात किंवा मारामारीत होते, याचे एक निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ रेकॉर्डिंग उपलब्ध करून देतील. हे फुटेज अहवाल तयार करण्यास आणि गैरवर्तन किंवा हल्ल्याच्या प्रकरणांमध्ये दोषींना ओळखण्यास मदत करेल. त्याच वेळी, कर्मचाऱ्यांचे संभाषण रेकॉर्ड होत असल्याने टीसी प्रवाशांशी वर्तन करताना अधिक जबाबदार राहतील. हा उपक्रम पश्चिम रेल्वेच्या ‘नमस्ते मोहिमे’चा एक भाग आहे. ज्यात तिकीट तपासणी प्रक्रिया अधिक नम्र, व्यावसायिक आणि उत्तरदायी बनवणे आणि तिकीट नियमांचे पालन सुनिश्चित करणे हा आहे. हे बॉडी कॅमेरे ड्युटीदरम्यानचे व्हिडिओ आणि संभाषण साठवण्यासाठी ‘एसडी-कार्ड’ आधारित रेकॉर्डिंग आणि मायक्रोफोनचा वापर करतील. रेकॉर्ड केलेल्या साहित्याचे वेळोवेळी पुनरावलोकन आणि विश्लेषण केले जाईल.

‘बॉडी कॅमेरे आणि विशेष जॅकेटच्या वापरामुळे तिकीट तपासणी मोहीम अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि व्यावसायिक होईल. यामुळे प्रवाशांचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल, तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि उत्तरदायित्व सुधारेल. या पायलट प्रोजेक्टच्या परिणामांच्या आधारे, संपूर्ण नेटवर्कवर या प्रणालीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन