इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम कूर्मगतीने; आता ३० नोव्हेंबर २०२६ चा वायदा  
मुंबई

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम कूर्मगतीने; आता ३० नोव्हेंबर २०२६ चा वायदा

दादर इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम कूर्मगतीने सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी ते आणखी लांबणीवर पडण्याची व खर्च वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तेजस वाघमारे

मुंबई : दादर इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम कूर्मगतीने सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी ते आणखी लांबणीवर पडण्याची व खर्च वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारणीसाठी मार्च २०१३ मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएमआरडीए’ची नियुक्ती केली. ११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी हे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, विविध कारणांनी स्मारकाचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. नुकतीच ‘एमएमआरडीए’ने कंत्राटदाराला ३० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. सध्या प्रकल्पातील इमारतींचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पुतळा उभारण्यात येणाऱ्या पेडस्टल बिल्डिंगचे काम ५५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच पुतळा बनविण्यासाठीचे थर्मोकोल मॉडेल तयार झाले आहे. एंट्रन्स प्लाझा, लेक्चर हॉल, लायब्ररी, प्रदर्शन हॉल, डबल बेसमेंट ही कामे पूर्ण झाली असून त्याच्या फिनिशिंगचे काम सुरु आहे. तर विविध विकासाची कामे ४४.६५ टक्के पूर्ण झाली आहेत. सध्याचे आखाती युद्ध लक्षात घेता, या कामाच्या उभारणीसाठी लागणारी साधनसामग्री मिळण्यात अडचणी येत असल्याने उर्वरित काम पुढील सात महिन्यात पूर्ण होणे कठीण झाल्याने प्रकल्पास पुन्हा नवी डेडलाईन द्यावी लागणार आहे. प्रकल्पाबाबत सरकार गंभीर नसल्याने स्मारकाचे काम रखडत असल्याची खंत स्मारकासाठी पाठपुरावा करणारे चंद्रकांत भंडारे यांनी व्यक्त केली. याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

स्मारकात ४६५ फुटांच्या राष्ट्रध्वजाची मागणी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणारे चंद्रकांत भंडारे यांनी स्मारकात काही गोष्टींचा समावेश करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र सरकारकडून याची दखल घेण्यात येत नसल्याची खंत भंडारे यांनी व्यक्त केली. स्मारकात ४६५ फुटांचा राष्ट्रध्वज उभारावा, स्मारकाचे देखभाल, व्यवस्थापन आणि संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाची असावी, स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची उद्देशिका उभारण्यात यावी आणि देशाचे प्रतिक असलेली ४ सिंहांची भव्य 'राजमुद्रा' स्मारकात बसवावी अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

शांतिस्थळ

मंजूर संकल्पनेनुसार संपूर्ण जागेची बगीचे असलेले 'शांतिस्थळ' म्हणून कल्पना केली आहे, ज्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत होईल. स्मारकामध्ये १०० फूट ऊंच पादपीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूने आच्छादित पुतळा असून बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट व पुतळ्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी चक्राकार उतरंड आहे. या व्यतिरिक्त सुमारे १००० आसनक्षमता असलेले प्रेक्षागृह, प्रदर्शनाकरीता दालने, संशोधन केंद्र, ग्रंथालय, ध्यानधारणा केंद्र, परीक्रमा पथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतीक्षालय, उपहार गृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृह, बगिचे, वाहनतळ इत्यादींचा स्मारकामध्ये समावेश आहे.

चौथरा आणि चैत्य सभागृह

या १०० फूट उंचीच्या चौथऱ्यामध्ये एक 'चैत्य सभागृह' उभारले जाणार आहे. ज्याची रचना बौद्ध वास्तुकलेच्या परंपरेतून प्रेरित असेल. २४ तांब्याच्या पत्र्यांनी मढवलेले आणि उभ्या रेषांचे नक्षीकाम असलेले घुमट हे या वास्तूचे वैशिष्ट्य असेल. या इमारतीत एक 'सर्पिल रॅम्प' (वळणावळणाचा मार्ग) असेल. जो अभ्यागतांना वरच्या दिशेने घेऊन जाईल. या रॅम्पवरून अभ्यागतांना जमिनीपासून थेट पुतळ्याच्या पायथ्याशी पोहचता येईल. याठिकाणी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करता येईल. त्यानंतर तिथून पुन्हा रॅम्पवरून खाली येत येणार आहे.

सांस्कृतिक दालन

हा विशाल परिसर एक भव्य सार्वजनिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये १,००० आसनक्षमता असलेले सभागृह, प्रदर्शन दालने, संशोधन केंद्र, व्याख्यान दालने, ग्रंथालय आणि परिषदांसाठीच्या सुविधांचा समावेश आहे. ध्यान केंद्र आणि परिक्रमा मार्ग यांसारख्या चिंतन व जनसंवादासाठीच्या जागा, तसेच पर्यटकांसाठीच्या इतर सुविधा येथे एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुशोभित उद्याने आणि ५०० वाहनांसाठीची भूमिगत पार्किंग व्यवस्थाही येथे आहे.

सुशोभित उद्याने आणि तलाव

सुमारे ६ टक्के भाग एका तलावासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. महाड येथील ऐतिहासिक 'चवदार तलावा'पासून प्रेरणा घेऊन या तलावाचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. हा तलाव डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक समानतेच्या लढ्याशी निगडित एक प्राचीन स्थळ आहे. या परिसरात हिरवीगार, सुशोभित उद्यानेही विकसित करण्यात आली आहेत.

प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी डिझाइन केलेला हा पुतळा, अनेक ठिकाणी एकाच वेळी चालणाऱ्या प्रक्रियेद्वारे साकारला जात आहे. २३० फूट उंचीपर्यंत विकसित करण्यात आलेला या पुतळ्याचे 'थर्मोकोल मॉडेल' (प्रतिकृती), आता प्रत्यक्ष पुतळ्याच्या निर्मितीसाठी आधार म्हणून वापरला जात आहे. या पुतळ्यासाठी ६,३०० टन पोलाद आणि ४५० टन कांस्य धातूची आवश्यकता आहे. यामुळे पुतळ्याचे एकूण वजन ६,४५० टन इतके होईल. आतापर्यंत, आवश्यक असलेल्या पोलादापैकी दोन-तृतीयांश भाग आणि १०७ टन कांस्य धातू खरेदी करण्यात आला आहे.

२०० किमी पर्यंतच्या वाऱ्याचा वेग झेलू शकणार

स्मारक समुद्र किनाऱ्यालगतचे असल्याने एमएमआरडीएने वाऱ्याच्या प्रवाहाचा अभ्यास देखील केला आहे. हे स्मारक ताशी २०० किलोमीटरपर्यंतच्या वाऱ्याचा वेग सहन करू शकेल. अशा प्रकारे त्याची अभियांत्रिकी रचना करण्यात आली आहे.

स्मारकाच्या कामाला आकार

राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारणीसाठी ९ मार्च २०१३ मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती केली.

११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी हे स्मारक तीन वर्षात पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला होता. यावेळी प्रकल्पाची किंमत ४२५ कोटी रुपये होती.

स्मारकाचा भूखंड केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या मालकीचा असल्याने त्याचा ताबा राज्य शासनाच्या वतीने एमएमआरडीएने २५ मार्च २०१७ रोजी हस्तांतरणीय विकास हक्काच्या मोबदल्यात घेतला.

१२ जानेवारी २०१८ रोजी एमएमआरडीएने या प्रकल्पासाठीच्या सुधारित खर्चाला मंजुरी दिली. त्यानुसार हा खर्च ७६३.०५ कोटींवर पोहचला. प्रकल्पाच्या कामासाठी 'शापूरजी पालोनजी' कंपनीची नेमणूक करण्यात आली. यावेळी प्रकल्प २०२० मध्ये पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

राज्य सरकारने पुतळ्याची उंची ३५० फुटांवरून वाढवून ४५० फूट केली. त्यामुळे प्रकलो खर्च १,०८९.९५ कोटींवर पोहचला.

* तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये प्रकल्प नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण होईल, असे म्हटले होते.

यामुळे स्मारकाला विलंब

प्रथम स्मारकातील पुतळ्याची उंची २५० फूट निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ३५० फूट आणि चबुतरा १०० फूट असे एकूण उंची ४५० फूट केली आहे. पुतळ्याच्या रचनेवरून वाद निर्माण झाला. कोरोना काळातीळ लॉकडाऊनमुळे काम ठप्प झाले होते. तसेच कंत्राटदाराला अनियमित निधी पुरवठा होत असल्याने काम रखडत असल्याचे समजते.

पुतळ्याचे ११ टक्केच काम पूर्ण

स्मारकातील पुतळ्याचे काम केवळ ११ टक्केच पूर्ण झाले आहे. पुतळा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ८५० टन ब्राँझपैकी आतापर्यंत केवळ १०७ टन ब्राँझचीच खरेदी करण्यात आली आहे, तर पुतळ्याचे पाय (शूज) सिलिकाच्या साच्यांमधून तयार करून घटनास्थळी आणण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत या भागांची जोडणी करून ते चौथऱ्यावर बसवले जाणार आहेत.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; हवामान विभागाचा पहिला अधिकृत अंदाज

खरातच्या मालमत्तांवर राज्यात EDच्या धाडी; २.४ कोटी गोठविले; मर्सिडिज जप्त; ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महिला आरक्षण: नव्या लढाईचे संकेत; ऐतिहासिक निर्णय- मोदी, संसदेवर बुलडोझर- सोनिया

होर्मुझ नाकेबंदीला इंग्लंड-फ्रान्सचा नकार; शेजारी देशातील बंदरांवर हल्ल्यांची इराणची धमकी

Thane : भ्रष्ट व्यवस्थेचे बळी; मुरबाडजवळ दोन गाड्यांची धडक, ११ जण जागीच ठार