मुंबई : दक्षिण मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील कोंबण्यात आलेल्या कैद्यांच्या भीषण परिस्थितीवर उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा बोट ठेवले. आर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा पाच ते सहापट अधिक कैदी आहेत. त्यामुळे तुरुंगामध्ये अमानवी परिस्थिती निर्माण झाली आहे. ड्रग्जचे व्यसन समाजासाठी गंभीर समस्या आहे. याचवेळी कैद्यांच्या गर्दीने भरलेल्या तुरुंगातील परिस्थितीत याचा समतोल साधणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला.
मेफेड्रोन हा अमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली समीर लतीफ शेख याला २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तो गेली चार वर्षे तुरुंगात असून खटल्यात प्रगती नसल्याने त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपठासमोर सुनावणी झाली.
यावेळी मुंबईच्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचे मुद्दा न्यायालयासमोर आला.याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती जाधव यांनी आरोपीला दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागल्याचे स्पष्ट करत आरोपी शेख याला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. शेखकडून जप्त केलेल्या मेफेड्रोनचे योग्य वजन नोंदवण्यात अस्पष्टता आहे. तसेच शेखला खटला पूर्ण न होताच जवळपास चार वर्षे तुरुंगात ठेवले आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
न्यायालय म्हणते
उच्च न्यायालय नियमितपणे दीर्घकाळ तुरुंगवास भोगणाऱ्या कच्च्या कैद्यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी घेत आहे. तुरुंगातील सध्याच्या भीषण परिस्थितीची न्यायालयाला तितकीच जाणीव आहे.
मुंबईतील प्रमुख कारागृह असलेल्या आर्थर रोड तुरुंगात मंजूर क्षमतेपेक्षा पाच ते सहापट अधिक कैद्यांची गर्दी आहे. ५० कैद्यांना ठेवण्यासाठी मंजूर असलेल्या प्रत्येक बॅरेकमध्ये २२० ते २५० कैद्यांना कोंबलेले आहे.
तुरुंगातील ही परिस्थिती अमानवीय आहे. ड्रग्जचे व्यसन समाजासाठी एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे जामीन अर्जावर निर्णय देताना या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखावे लागत आहे.