मुंबई : जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील दक्षिणेकडील उड्डाणपुलाची झालेली दुरवस्था आता दूर होणार आहे. मुंबई महापालिकेच्या पूल विभागाकडून या पुलाची संरचनात्मक मजबुती आणि मोठी दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल २७ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हा प्रमुख मार्ग असून, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ट्रॉमा रुग्णालयाच्या परिसरातून पुढे एस. व्ही. रोडकडे जाण्यासाठी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
या पुलाची आयआयटी आणि व्हीजेटीआय यांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी तपासणी करण्यात आली होती. तपासणीनंतर पुलाची संरचनात्मक मजबुती वाढविण्यासह आवश्यक मोठी दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुलाच्या मधल्या भागातील विविध दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामध्ये एक्स्पान्शन जॉइंट्स, बीम तसेच संरचनेशी संबंधित अन्य महत्त्वाच्या भागांची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
दुसऱ्या पुलाचे कामही सुरू
पुलाला पर्यायी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएकडून दोन्ही बाजूंनी दुसऱ्या पुलाची जोडणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एमएमआरडीएचे हे काम पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेच्या हद्दीतील विद्यमान पुलाची दुरुस्ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पूल बंद केल्यास वाहतुकीचा बोजवारा
दुरुस्तीच्या काळात जोगेश्वरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची आवश्यकता भासल्यास वाहनचालकांसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. जोगेश्वरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहनांना गोरेगाव किंवा अंधेरी उड्डाणपुलाचा पर्यायी मार्ग वापरावा लागू शकतो. परिणामी या दोन्ही मार्गांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येऊन वाहतूककोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरुस्तीचे नियोजन करताना वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, याची काळजी घेण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.