मुंबई

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत करणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती

कांजूर डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट २५ वर्षांसाठी देण्यात आले आहे. मात्र याठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या होत नसल्याने कांजूर, विक्रोळी परिसरात दुर्गंधी पसरत असून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Swapnil S

मुंबई : कांजूर डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट २५ वर्षांसाठी देण्यात आले आहे. मात्र याठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या होत नसल्याने कांजूर, विक्रोळी परिसरात दुर्गंधी पसरत असून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मेसर्स अँथनी लारा एन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हा कंत्राटदार योग्य पद्धतीने काम करत नसून त्याची चौकशी करत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा सदस्य मिहिर कोटेचा यांनी शुक्रवारी सभागृहात केली. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा व्यवस्थापन प्रक्रियेबाबत सातत्याने येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

कांजूर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचे सांगत विधानसभा सदस्य मिहिर कोटेचा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी आमदार सुनील राऊत, अस्लम शेख, अतुल भातखळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

२०११ मध्ये मेसर्स अँथनी लारा एन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सन २०११ मध्ये २५ वर्षांसाठी कांजूर डम्पिंग प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र कंत्राटाच्या अटीप्रमाणे सर्व ऑपरेशन, मेंटेनन्स, दुर्गंधीचे व्यवस्थापन केले जात नाही,

अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल. या समितीमध्ये संबंधित विभागांच्या वर्ग-१ अधिकाऱ्यांची समिती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

बाह्य लेखापरीक्षण करणार

कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराला पुढील कंत्राटासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडसंदर्भातील तक्रारींची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र तज्ज्ञांकडून बाह्य लेखापरीक्षण केले जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस