मुंबई

केतन अग्रवाल हत्या प्रकरण : आणखी एकाला होती कल्पना; चेतनने मित्राशी केली होती चर्चा, मित्र मूळचा बीड जिल्ह्यातील

केतनच्या हत्येचा कट केवळ सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाच ठाऊक नव्हता, तर चेतनच्या एका वर्गमित्रालाही याबद्दल आधीच माहिती होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात एक मोठा ट्विस्ट पुढे आला आहे. केतनच्या हत्येचा कट केवळ सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाच ठाऊक नव्हता, तर चेतनच्या एका वर्गमित्रालाही याबद्दल आधीच माहिती होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी-बाणेर परिसरातील एका नामांकित खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता आणि या दोघांनी हत्येचा कट रचताना त्याच्याशी सविस्तर चर्चाही केली होती.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, चेतन आणि सियाने या मित्राला केतनची हत्या करण्याच्या प्लॅनबद्दल सांगितले होते, तेव्हा या मित्राने त्यांना ‘हत्या करण्याची गरज नाही, तुम्ही असे काही करू नका’ असा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे, १८ जून रोजी हत्येच्या दिवशी चेतनने या मित्रालाही लोहगडावर आपल्यासोबत येण्याचा मोठा आग्रह केला होता, मात्र तो तरुण त्या दिवशी तिथे गेला नाही आणि त्याने आपला फोनही बंद ठेवला होता.

माफीचा साक्षीदार करणार?

धक्कादायक बाब म्हणजे, केतनला दरीत ढकलून दिल्यानंतर चेतन सर्वात आधी याच मित्राला जाऊन भेटला होता. जर या मित्राने वेळेत पोलिसांना या कटाची माहिती दिली असती, तर कदाचित ही हत्या रोखता आली असती आणि केतनचे प्राण वाचले असते. पुणे ग्रामीण पोलिसांनी सध्या या तरुणाला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याला या प्रकरणात माफीचा साक्षीदार केले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

सिया गोयलची मुजोरी

दुसरीकडे, सिया हिला पोलीस तपासासाठी गंगाधाम परिसरातील तिच्या घरी घेऊन गेले असता, तिथे आलेल्या माध्यम प्रतिनिधींना बघून सियाने अश्लील हावभाव केले आणि मधले बोट दाखवून आपली मुजोरी दाखवून दिली.

एका निष्पाप तरुणाची हत्या केल्याचा कोणताही पश्चात्ताप तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. ती अत्यंत निर्लज्ज पद्धतीने वागत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ती पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नसून वारंवार आपली विधाने बदलत आहे आणि हत्येचा संपूर्ण दोष चेतन चौधरीवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम