मुंबई

‘हरियालीचा राजा’ बनलाय निराधारांचा आधारवड, विक्रोळीच्या गणेशोत्सव मंडळाची अशीही जनसेवा

तेजस वाघमारे

मुंबई: विक्रोळीच्या हरियाली व्हिलेज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली वेगळी ओळख जपत जनसेवेचे कार्य अविरतपणे चालविले असून हे मंडळ आठ निराधार नागरिकांचा आधारवड बनले आहे.

हरियाली व्हिलेज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने २००८ पासून विक्रोळीतील निराधार नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा उपक्रम अखंडितपणे राबवला आहे. या मंडळाने ८ निराधार व्यक्तींचे पालकत्व स्वीकारले आहे. प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला मंडळाकडून निराधारांना जीवनावश्यक वस्तू थेट घरपोच दिल्या जात आहेत. याआधी तब्बल १० निराधारांना मंडळाकडून दरमहा रेशन पुरवले जात होते. त्यापैकी २ निराधारांचा मृत्यू झाल्याने मंडळ सध्या ८ निराधारांचा आधारवड बनले आहे. या निराधारांना पाच किलो गहू, दहा किलो तांदूळ, साबण, तेल अशा दैनंदिन अत्यावश्यक वस्तू देण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदेश दिघे यांनी दिली.

हे मंडळ दरवर्षी आठ फुटाची गणेश मूर्ती आणते. मूर्ती सहज उचलून व्यवस्थित विसर्जन करता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. मंडळाची मूर्ती शाडू मातीची असून त्याचे पेटंट घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 'हरियालीचा राजा' म्हणूनही नोंदणी करण्यात आली आहे.

उद्धव, राज, शिंदे यांनी एकत्र यावे!

मराठी माणसांची एकजूट कायम टिकावी यासाठी माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, असा संदेश देणारा देखावा मंडळाने यंदा साकारला आहे. विक्रोळीप्रमाणे राज्यात अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असाही संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे.

जनजागृतीचे विविध उपक्रम

हरियाली व्हिलेज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १९६३ साली स्थापन झाले. तेव्हापासून मंडळामार्फत आजतागायत गणेशोत्सव आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापूर्वी स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री अत्याचार अशा विषयांना देखाव्यांमधून समाजापुढे आणले होते.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला