

बांगलादेशच्या माजी महिला पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) अध्यक्षा खलिदा झिया यांचे मंगळवारी (दि. ३०) ढाकामध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. बांगलादेशच्या 'पहिल्या महिला पंतप्रधान' अशी त्यांची ओळख होती.
खलिदा झिया यांची तब्येत खालावल्यानंतर २३ नोव्हेंबरला त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान छातीतील संसर्ग आढळून आल्याने डॉक्टरांनी त्यांना देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र २७ नोव्हेंबरला त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या कोरोनरी केअर युनिटमध्ये (CCU) हलवण्यात आले.
देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी राजकीय चढाओढ
बांगलादेशच्या राजकारणात खलिदा झिया आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यातील दीर्घकाळ चाललेली राजकीय चढाओढ देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी ठरली. खलिदा झिया यांच्यावर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१८ मध्ये त्यांना १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीतून लावण्यात आल्याचा दावा त्यांनी सातत्याने केला होता.
भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता
जानेवारी २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत त्या पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. उपचारासाठी त्या ब्रिटनमध्ये होत्या आणि मे महिन्यात त्या बांगलादेशात परतल्या होत्या.
लष्करी हुकूमशाहीविरोधात मोठे जनआंदोलन
खलिदा झिया यांचा भारताशीही विशेष संबंध होता. त्यांचा जन्म १९४५ मध्ये पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. तेव्हा हा भाग ब्रिटिश भारतातील बंगाल प्रेसिडेन्सीतील दिनाजपूर जिल्ह्याचा भाग होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील म्हणजेच आताच्या बांगलादेशातील दिनाजपूर शहरात स्थलांतरित झाले.
खलिदा झिया यांचे पती बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान होते. १९८१ मध्ये लष्करी उठावात त्यांची हत्या झाली. त्यानंतर खलिदा झिया यांनी लष्करी हुकूमशाहीविरोधात मोठे जनआंदोलन उभारले आणि अखेर १९९० मध्ये लष्करी राजवटीचा अंत झाला. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. त्यांनी १९९१ ते २००६ या कालावधीत तीन वेळा देशाचे नेतृत्व केले.
पंतप्रधान मोदींकडून आदरांजली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलिदा झिया यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर शोकसंदेश देताना त्यांनी भारत-बांगलादेश संबंध दृढ करण्यात खलिदा झिया यांचे योगदान अधोरेखित केले.
“ढाकामध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा बेगम खलिदा झिया यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि बांगलादेशातील जनतेप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो,” असे मोदी यांनी म्हटले.
“बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या विकासात आणि भारत-बांगलादेश संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१५ मध्ये ढाकामधील आमची भेट मला आजही आठवते. त्यांचा वारसा दोन्ही देशांच्या भागीदारीला दिशा देत राहील,” असेही त्यांनी नमूद केले.