

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीतील जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (दि.३०) जोरदार टीका केली. भाजप- शिवसेना शिंदे गट यांच्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे उलटल्याचा दावा करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
“पूर्वी शिवसेना भाजपला जागा वाटायची. आज परिस्थिती अशी आहे की त्यांना जागांसाठी भाजपच्या दारात उभं राहावं लागतंय,” असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच, "मुंबईत केवळ ९० जागांवर समाधान मानावं लागतंय", असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राऊत म्हणाले की, "आतापर्यंत मुंबईत शिवसेनाच भाजपाला जागा देत होती. पण आज परिस्थिती उलटी झाली आहे. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना भाजपकडे जागा मागाव्या लागत आहेत. भाजपने फेकलेल्या जागांवर निवडणूक लढवावी लागत आहे. हे अत्यंत हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणं आहे. गेल्या ६० वर्षांत शिवसेना कधीही कोणाच्या दारात उभी राहिली नाही," असा दावा त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, "शिंदे गटाला युतीसाठी अमित शहांच्या दारात जावं लागलं आणि आता भाजपने दिलेल्या जागांवरच त्यांना लढावं लागत आहे." असे म्हणत राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. २०१७ मध्ये भाजपची भूमिका नाकारून शिवसेनेने स्वाभिमानाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, याची आठवण राऊतांनी करून दिली. "शिवसेनेने निवडणूक स्वबळावर लढली; पण कधीही लाचारी स्वीकारली नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
"आम्ही अमित शहांच्या दारात जाऊन गवतावर बसलो नाही किंवा अपमान सहन करून परत आलो नाही, आम्ही लढलो," असं सांगत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर टीका केली. "आज मात्र चित्र वेगळं असून अशा स्थितीत त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणवून घेणं थांबवावं. त्यांची शिवसेना नकली आहे. मी त्या पक्षाला अमित शहांची शिवसेना म्हणतो," असा थेट घणाघात संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, महायुतीत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचा समावेश आहे. २२७ सदस्यांच्या मुंबई महानगरपालिकेसाठी झालेल्या जागावाटपानुसार भाजप १३७ जागांवर, तर शिंदे गट शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे.
दोन्ही पक्ष आपल्या कोट्यातील काही जागा मित्रपक्षांसाठी राखीव ठेवणार आहेत. मात्र अंतिम उमेदवार यादी गोपनीय ठेवण्यात आली असून, नामांकन दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या आसपास ती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत माहितीनुसार, मंगळवारी उमेदवारांना एबी फॉर्म्स वितरित करण्यात येत असून, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात करतील. या जागावाटपाचा मुख्य उद्देश म्हणजे युतीतील पक्षांमध्ये थेट लढती टाळणे आणि निवडणुकीदरम्यान समन्वय राखणे, असे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (SEC) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही देशातील सर्वात महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी एक मानली जाते. प्रचंड अर्थसंकल्प आणि मुंबईच्या नागरी प्रशासनावर असलेले नियंत्रण यामुळे या निवडणुकीचा निकाल राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे.