Mumbai : ‘वर्षा’वर धडकण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांची धरपकड; कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आघाडीचे आंदोलन 
मुंबई

Mumbai : ‘वर्षा’वर धडकण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांची धरपकड; कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आघाडीचे आंदोलन

अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, या मागणीसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चाचा इशारा सेण्यात आला होता.

Swapnil S

मुंबई : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, या मागणीसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चाचा इशारा सेण्यात आला होता. पण तो निघण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. मोर्चा काढण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नेते आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रुपये आणि काजू उत्पादकांना हेक्टरी ३ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. याशिवाय पीकविमा, कर्जमाफी, वीजबिल सवलत आणि बागायती पुनर्बांधणीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी विरोधी पक्ष, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, शेतकरी संघटना, कोकणातील बागायतदार आणि विविध सामाजिक संघटनांनी गिरगाव चौपाटी ते वर्षा असा मोर्चा काढण्याची तयारी केली होती. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांसह आंदोलक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंत्रालयासामोरील 'शिवालय' या कार्यालयासमोर जमले होते.

शेकडो कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, शिवसेना नेते विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, मराठी भाषा समितीचे दीपक पवार, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना 'शिवालय' येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी काही जणांना डोंगरी आणि काही जणांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

मदत मिळेपर्यंत संघर्ष सुरु : हर्षवर्धन सपकाळ

शेतकरी आज आपल्या हक्कासाठी मुंबईत आले असताना पोलिसांच्या मदतीने त्यांना रोखण्यात आले. सरकारच्या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. कोकणातील शेतकऱ्यांच्या पदरात भरीव मदत पडेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना किंमत चुकवावी लागेल- राजू शेट्टी

गेल्या अडीच महिन्यापासून कोकणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार - पाच वेळा कोकणात आले. पण या अडीच महिन्यात त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांनी शेतकाऱ्‍यांच्या बांधावर जाऊन तपासणी करायला हवी होती. शेतकऱ्‍यांच्या वेदना समजून घ्यायला पाहिजे होत्या, पण त्यांनी साधे निवेदनही घेतले नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी सगळे दौरे रद्द करून कोकणातील शेतकऱ्‍यांचे दु:ख जाणून घ्यायला हवे होते. सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक घ्यायला हवी होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांना याची किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

मुंबई-गोवा महामार्गावर ‘वसुली सुरू’; रायगड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी खारपाडा येथे पहिला टोल लागू

Mumbai : मोकळे फुटपाथ देण्यास प्राधान्य -अश्विनी भिडे

शिवसेना चिन्ह वादाची सुनावणी : नेत्यांनी जबाबदारीने बोलावे, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

Fuel Price Hike : पेट्रोल, डिझेल कडाडले; प्रत्येकी ३ रुपयांची दरवाढ

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णींचे निधन