मुंबई

क्रांतिवीर महात्मा फुले रुग्णालयाला नवीन लूक; ५०० बेड्स, ऑपरेशन थिएटर, मनोरंजन मैदान

विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये असलेले महात्मा जोतिबा फुले रुग्णालय हे विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई आणि भांडुपमधील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वाचे होते.

Swapnil S

मुंबई : अद्ययावत ऑपरेशन थिएटर, ५०० बेड्स, स्टाफ क्वॉर्टर्स सोयीसुविधांसह विक्रोळीत लवकरच सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभे राहणार आहे. म्हाडाने क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाला याआधीच हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी मुंबई महापालिकेने मंगळवारी निविदा मागवल्या असून सुसज्ज रुग्णालय व स्टाफ क्वॉर्टर्ससाठी तब्बल ५०२ कोटी ९३ लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विक्रोळीत महात्मा जोतिबा फुले रुग्णालयांचा पुनर्विकास झाल्यानंतर विक्रोळी, कांजूर, भांडुप, पवई परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये असलेले महात्मा जोतिबा फुले रुग्णालय हे विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई आणि भांडुपमधील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वाचे होते. १९८० साली उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने ८ वर्षापूर्वी बंद करण्यात आली आहे. तसेच येथे अपुऱ्या सुविधा, आवश्यक यंत्रसामगी नसल्याने या परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा केल्याने म्हाडाने पुनर्विकासासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला असून पुढील तीन ते चार वर्षांत विक्रोळीकरांना अद्ययावत सुसज्ज सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळणार आहे.

पूर्व उपनगरात विक्रोळी येथील महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाची इमारत जुनी व धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली आणि रुग्णालय इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र पुनर्विकासाच्या कामात तांत्रिक अडचणी आल्याने रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास रखडला होता. या रुग्णालयाशेजारी म्हाडाचा सुमारे ३२ हजार ८२५ चौरस मीटरचा भूखंड असून तो एकत्रित करून पुनर्विकासात ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. तळघर, तळमजला अधिक १३ मजल्यांची रुग्णालय इमारत असून २१ मजल्यांची डॉक्टर आणि परिचारिकांसाठी निवासी इमारत असणार आहे.

कॅमेरे, मनोरंजन मैदान!

३२ हजार ८२५ चौरस मीटर क्षेत्रफळावर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास होणार आहे. रुग्णालय व स्टाफ क्वॉर्टर्स परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विस्तारले जाणार आहे. तसेच स्टाफ क्वॉर्टर्स इमारतीत सभागृह, उपहारगृह, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, ओपीडी अशा सोयीसुविधा असणार आहेत.

पूर्व उपनगरवासीयांच्या सेवेत लवकरच

महापालिकेतर्फे ५०० रुग्णशय्याचे सुसज्ज रुग्णालयाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आली आहे. तळ अधिक १३ व तळ अधिक २१ मजली इमारत बांधण्यात येणार असून क्षेत्रफळ ५७८२.२७ चौरस मीटर आहे. तर एकूण बांधकाम क्षेत्र हे ४३५७१.९४ चौरस मीटरवर होणार आहे. निविदा मागवण्यात आल्या असून लवकरच कामाला सुरुवात होईल आणि विक्रोळी, भांडुप, घाटकोपरवासीयांच्या सेवेत येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उपवास्तू शास्त्रज्ञ दुर्गेश पालकर यांनी दिली.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला