मुंबई : कुर्ला येथे सात जणांचा बळी घेणाऱ्या बेस्ट बसचा चालक संजय मोरे (वय ५४) याला इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चालवण्याचा अनुभव नव्हता, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. चालकाने पोलिसांना सांगितले की, त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचे १० दिवसांचे प्रशिक्षण मिळाले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीत मोरे यांनी सांगितले की, त्याने १ डिसेंबरपासूनच बेस्टच्या इलेक्ट्रिक बस चालवायला सुरुवात केली होती. त्यापूर्वी तो मिनी बस चालवत असे. त्याने १० दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा केला असून अपघाताच्या रात्री तो बस नियंत्रित करू शकला नाही, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी चौकशीत मोरे याचे मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे आढळले असून प्राथमिक वैद्यकीय अहवालांनुसार तो मद्याच्या प्रभावाखाली नव्हता, असेही स्पष्ट करण्यात आले.
हैदराबादस्थित ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने तयार केलेल्या १२ मीटर लांब बसची न्यायवैज्ञानिक तज्ज्ञ आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तपासणी केली. अपघातासाठी कोणतेही यांत्रिक बिघाड कारणीभूत होते का, याचा शोध घेतला जात आहे.
हा अपघात ब्रेकफेल झाल्यामुळे घडल्याची शक्यता आहे. स्थानिकांनी अपघातानंतर चालक मोरे यांला पकडण्यात येऊन त्याला पोलिसांच्या हवाली करण्यापूर्वी मारहाण करण्यात आली. काहींनी चुकून बस कंडक्टरलाच चालक समजून त्यालाही मारहाण केली, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
अपघातापूर्वी बसचे २०० मीटरपर्यंत वळण
बेस्ट बसने २०० मीटरपर्यंत वळण घेतल्यानंतर अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली, असे अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पादचारी आणि वाहनांना धडक दिल्यानंतर बस बुद्ध कॉलनी निवासी सोसायटीमध्ये थांबली.
२६ वर्षीय झैद यांनी सांगितले की, बसचालक भरधाव वेगाने होता आणि बसने २०० मीटरपर्यंत वळण घेतल्यानंतर रस्त्यावर अनेक वाहनांना धडक दिली. आम्ही रिक्षातील प्रवाशांना बाहेर काढून त्यांना भाभा रुग्णालयात आणखी एका रिक्षेमधून नेले. माझ्या मित्रांनीही जखमींना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला, अहमद यांनी सांगितले.
कुर्ल्याचे रहिवासी झैद अहमद यांनी सांगितले की, ते रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडत असताना त्यांनी आवाज ऐकला. घटनास्थळी पाहिले की बेस्ट बसने धडक दिली आहे.
तोट्यातील बेस्ट पुन्हा चर्चेत, ईव्ही बस, कंत्राटी कामगारांबाबत प्रश्नचिन्ह
कुर्ला येथे सोमवारच्या रात्री सात बळी घेणाऱ्या बेस्ट बस अपघातामुळे इलेक्ट्रिक बस आणि कंत्राटी कामगार चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तोट्यातील बेस्टच्या ताफ्यात हजारोच्या संख्येने दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस प्रवाशांना गारेगार प्रवासानुभव आणि घड्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना इच्छितस्थळी वेगाने पोहोचवित असल्या तरी त्यातील ‘हाले-डुले’मुळे बसमधील प्रवाशांना जायबंदीही व्हावे लागते. स्वयंचलित दरवाज्यांच्या ‘कचाट्यात’ सापडून प्रवाशांना मुकामारही बसतो.
कुर्ला अपघातातील बस इलेक्ट्रिकवर चालणारी आहे. ओलेक्ट्रा कंपनीच्या बनावटीची बस बेस्टने वेट-लीजवर घेतली होती. ही बस तीन महिन्यांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली होती.
यावर्षी २० ऑगस्ट रोजी ती ईव्ही ट्रान्स नावाच्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत झाली होती, असे ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) एका अधिकाऱ्याने सांगितले.