मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेतून महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२० जून) वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या उद्योग-व्यवसायासाठी शून्य टक्के व्याजदरात कर्जपुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.
या निर्णयाअंतर्गत, मुंबईतील लाभार्थी महिलांना आता १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ आणि पर्यटन संचालनालय या चार महामंडळांच्या व्याज परतावा योजनांची सांगड मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी घालण्यात आली आहे.
महिलांना होणार फायदा -
१. लाडक्या बहिणींचा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग मोकळा
२. १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने
३. ४ प्रमुख महामंडळांमार्फत व्याज परतावा
४. ५ ते १० महिला एकत्र येऊनही व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात
५. लाभासाठी मुंबई बँकेकडे अर्ज आवश्यक
६. व्यवसाय तपासणीनंतर कर्ज मंजुरीचा निर्णय
७. योजनेचा लाभ सुमारे १२ ते १३ लाख महिलांना
या बैठकीस आमदार चित्रा वाघ, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, विविध महामंडळांचे अधिकारी, तसेच संबंधित खात्यांचे सचिव व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बहिणींना उद्योग व्यवसायाचे दालन मोकळे - दरेकर
प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, "या निर्णयामुळे मुंबईतील लाखो लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायाचे दालन मोकळे झाले व यामुळे लाडक्या बहिणींचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान राहील."
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीही स्पष्ट केले होते की, लाडक्या बहिणींचे पैसे उद्योगाच्या माध्यमातून बाजारात यायला हवेत. हा निर्णय त्याच दृष्टिकोनातून घेण्यात आला असून तो राज्यातील महिलांसाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.