मुंबई

चैत्यभूमीवर लाखो आंबेडकरी अनुयायी झाले नतमस्तक

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर शुक्रवारी विशाल जनसागर उसळला. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतचा परिसर आंबेडकरी अनुयायांमुळे फुलून गेला होता. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, या घोषणानी परिसर दणाणून गेला होता.

Swapnil S

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर शुक्रवारी विशाल जनसागर उसळला. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतचा परिसर आंबेडकरी अनुयायांमुळे फुलून गेला होता. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, या घोषणानी परिसर दणाणून गेला होता.

महापालिका प्रशासन, राज्य सरकार आणि विविध सामाजिक सेवा संस्थांनी या अनुयायांसाठी विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये मार्ग दिशादर्शकापासून ते पाणी, भोजन, आरोग्य सेवा आणि निवाऱ्यापर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. बाबासाहेबांच्या स्मृती जागवत अभिवादन केल्यानंतर अनुयायी समाधान व्यक्त करत होते.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावर चैत्यभूमी येथे जाणाऱ्या अनुयायांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी ठाणे जिल्ह्यातून तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल होत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर चालायला जागा शिल्लक नव्हती. यावेळी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी रस्ता माहीत नसलेल्या अनुयायांना वाट दाखवण्याचे काम करत होते.

मुंबई बाहेरून येणाऱ्या सर्व अनुयायांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात भोजन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था तसेच निवारा व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र, येणाऱ्या अनुयायांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की ही व्यवस्था सुद्धा अपुरी असल्याचे दिसत होते. त्यामुळे अनुयायी निवारा मंडपाच्या बाहेर मिळेल तिथे पथारी पसरून बसलेले दिसत होते.

मोठ्या प्रमाणात जनसागर लोटल्यामुळे चैत्यभूमी दर्शनासाठीची रांग वरळी सास्मिरापर्यंत दुपारी पोहोचली होती. तीन किलोमीटरच्या रांगेत अनुयायी दर्शनासाठी उभे होते. मात्र, चैत्यभूमीवर दर्शन घेतल्यानंतर अनुयायी समाधान व्यक्त करत निवारा शोधत होते. सांगलीहून आलेले संतोष कांबळे यांचे कुटुंब म्हणाले की, मागील १५ वर्षे आम्ही मिरजेहून चैत्यभूमीवर दर्शनासाठी येत असतो. महापालिका आणि राज्य प्रशासनाने केलेली व्यवस्था खूपच चांगली आहे. लाखो बांधव इथे येत असल्याने निश्चितच काही त्रुटी राहणार त्या आम्हाला मान्य आहेत. आम्ही इथे येतो ते आमच्या पुढील पिढीला बाबासाहेबांचे कार्य आणि विचार यांची माहिती व्हावी, त्यांच्यापर्यंत ती पोहोचावी म्हणून. बाबासाहेबांसारखे विचार समाजाला नवीन दिशा देणारे आहेत.

राजकीय नेत्यांनी केले अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, माजी खासदार नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागसेन कांबळे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. सिनेविश्वातून क्रांती रेडकर आणि त्यांचे पती समीर वानखेडे हेही चैत्यभूमीवर उपस्थित होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक