गणेशचतुर्थीच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या असून, हजारो लोकं नवसाला पावणाऱ्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये दाखल झाले आहेत.
लालबागचा राजा हा मुंबईतील गणेशोत्सवाचा मुख्य आकर्षण मानला जातो. दरवर्षी येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही मंडळाने आकर्षक सजावट केली असून, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची ओढ पहिल्याच दिवशी स्पष्टपणे दिसली.
दरम्यान, लालबागच्या राजाच्या दरबारातील गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दर्शनासाठी झालेली प्रचंड गर्दी दिसत असून, त्यामुळे लालबागला जाण्याआधी भक्तांनी विचार करावा, असा इशारा नेटकरी देत आहेत.
मुंबईतील लालबाग हा भाग गणेशभक्तांसाठी ‘पंढरी’ मानला जातो. दोन-दोन दिवस रांगेत उभे राहून दर्शन घेणाऱ्या भाविकांची परंपरा यंदाही कायम राहिली असून, लालबागचा राजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.'