मुंबई

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरण हायकोर्टात

नवशक्ती Web Desk

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. देविदास आर. शेळके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे.

अंतरवाली सराटी इथे १ सप्टेंबर रोजी जवळपास १५०० पोलीस आणि एसआरपीएफ जवानांनी शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर अतिशय निर्दयी पद्धतीने लाठीमार केला. आंदोलन उधळून लावण्यासाठी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या तसेच गोळीबारदेखील करण्यात आला. आंदोलकांच्या अंगावर छर्रे झाडण्यात आले. अनेक आंदोलकांना पोलिसांनी घरात घुसून मारले. त्यामध्ये शंभरपेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले. काही आंदोलक गंभीररीत्या जखमी झाले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

जीव वाचवण्यासाठी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात १० ते १२ पोलीस जखमी झाले. त्याविरोधात पोलिसांनी ७०० पेक्षा अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, पोलिसांनी आंदोलकांवर जो निर्दयी हल्ला केला आणि ज्या अधिकाऱ्यांच्या तोंडी अथवा लेखी आदेशाने हा हल्ला करण्यात आला त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी या मारहाणप्रकरणी जे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सहभागी आहेत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची तटस्थ आणि पारदर्शीपणे न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच ज्या आंदोलकांना मारहाण झाली किंवा जखमी झाले; त्यांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झालेले असल्याने त्यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या फौजदारी जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस