मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबईतील बेकायदा बाधकामे, बेवारस वाहने हटवण्याची मोहीम पालिकेने वॉर्ड स्तरावर हाती घेतली आहे. पालिकेच्या जी दक्षिण विभागांतर्गत शुक्रवारी लोअर परळ रेल्वे स्थानक परिसरात असलेली २१ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. तर ४ बेकायदा स्टाॅल्सवर कारवाई करण्यात आली असून, ५ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग केलेली ५६ वाहने हटवण्यात आली असून, स्वच्छता मोहिमेेंतर्गत ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महापालिकेचे संतोषकुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त जी दक्षिण यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सखोल स्वच्छता अभियानांतर्गत लोअर परेल रेल्वे स्थानक परिसर, सीताराम जाधव मार्ग, जी. एम. भोसले मार्ग, ना. म. जोशी मार्ग येथे कारवाई पार पाडली. यात २१ अनधिकृत शेड, ३६ लाकडांचे बाकडे व ४ अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले. तसेच, ८७ बेवारस वाहनांना हटविण्याकरिता नोटीस बजावल्या आहेत. तसेच ५६ बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याचे धोंडे यांनी सांगितले.
५०हून अधिक अधिकारी, दोन डंपर
या अभियानासाठी १ जे सी बी, ३ लॉरी, २ डंपर, २ यूटीलीटी गाडी आदी यंत्रसामग्री आणि ५० हून अधिक अधिकारी व कामगार उपस्थित होते.