Mumbai : सिलिंडर दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक संकटात 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : सिलिंडर दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक संकटात

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची विक्रमी वाढ केल्यामुळे मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना मोठा फटका बसणार आहे.

प्रतिनिधी

मुंबई/धैर्य गजरा

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची विक्रमी वाढ केल्यामुळे मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना मोठा फटका बसणार आहे. या एकाच महिन्यातील सर्वात मोठ्या वाढीमुळे शहरातील व्यावसायिक सिलिंडरचा दर ३,०२४ रुपयांवर पोहोचला आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून झालेली ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी मार्चमध्ये ११५ रुपये आणि एप्रिलमध्ये १९६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. 'इंडियन ऑईल'च्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात गेल्या ३ महिन्यांत ७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ही दरवाढ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी मोठा धक्का असून, ते व्यावसायिक एलपीजीचे सर्वात मोठे ग्राहक आहेत. एक महिन्याहून अधिक काळापासून सुरू असलेल्या गॅसच्या तुटवड्यामुळे आधीच ते अडचणीत सापडले आहेत. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इराणी कॅफेपासून ते उपनगरातील उडुपी हॉटेल्सपर्यंत सर्वत्र या निर्णयामुळे संताप व्यक्त होत आहे. छोट्या व्यावसायिकांना आणि प्रामुख्याने क्लाउड किचन चालकांना अवघ्या ३ महिन्यांत १,३०० रुपयांपेक्षा जास्त झालेली दरवाढ सहन करणे कठीण झाले आहे.

'इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन'चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी नमूद केले की, उद्योगाला अजूनही केवळ २० टक्के पुरवठा मिळत असून ताज्या दरवाढीमुळे पुनरुत्थानाची सर्व आशा संपली आहे. ही ३३ टक्क्यांची दरवाढ ग्राहकांवर न लादता पचवणे शक्य होणार नाही. इंधन हा सर्वात मोठा खर्च असून त्यात वाढ झाल्यास परिचालन खर्च वाढतो. त्यामुळे व्यावसायिकांना दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गेल्या ३ महिन्यांत त्यांनी शेकडो रुपयांची दरवाढ स्वतःच सहन केली आहे, मात्र ३३ टक्के दरवाढ ग्राहकांवर न लादल्यास त्यांना व्यवसाय बंद करून गावाकडे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

खाद्यपदार्थांची दरवाढ अटळ

नवीन दरवाढीमुळे ग्राहकांना मेनू कार्डमधील बदलांचा सामना करावा लागणार आहे. एप्रिलमध्ये काही आस्थापनांनी आधीच १० टक्के मूल्य दुरुस्ती आणि ५ टक्के गॅस संकट शुल्क लागू केले होते. मात्र, ताज्या दरवाढीमुळे पुन्हा दर पुनरावलोकन करावे लागणार आहे. 'हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया'नुसार, खाद्यपदार्थांवर कमीत कमी १० ते १५ टक्के दरवाढ अटळ आहे. मात्र, 'आहार'चे शेट्टी यांनी सांगितले की, व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी रेस्टॉरंट्सना किमान २० टक्के दर वाढवावे लागतील.

NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

शिक्षकांना अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ; माहितीचा वार शनिवार निश्चित

Mumbai : यकृत, मधुमेहावर प्रभावी उपचारांचा नवा मार्ग मोकळा; ‘आयआयटी बॉम्बे’च्या संशोधनातून यश

Kalyan-Dombivli : अतिधोकादायक इमारतीतच KDMC चा आपत्कालीन कक्ष; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी