मुंबई : तासनतास प्रवासादरम्यान ताटकळत राहणाऱ्या प्रवाशांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी मढ ते वर्सोवा असा खाडी पूल उभारला जाणार आहे. नुकतच या प्रकल्पासाठी पर्यावरणीय विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र, उच्च न्यायालयाची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यासाठी एक - दिड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार आहे.
मालाडमधील मढ ते वर्सोवाच्या २२ किमी प्रवासासाठी प्रवाशांना किमान ९० मिनिटे प्रवास करावा लागतो. यादरम्यान वाहतूककोंडी झाल्यास प्रवाशांना एकाच ठिकाणी तासनतास थांबावे लागते. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांकडून पुलाची मागणी होत होती. त्यानुसार खासदार पीयूष गोयल यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत आवश्यक असलेल्या केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या परवानग्या मिळवल्या आहेत. मात्र, या ठिकाणी जवळपास २.७५ हेक्टर खारफुटी वन जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असणार आहे. तर, महापालिकेने तोड केलेली खारफुटी पुन्हा लावण्यासाठी तीन हेक्टर जमिनीची निवड केली आहे. जंगलतोड केलेल्या प्रत्येकी एका झाडामागे तीन झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
असा असेल पूल
या पुलावर चार लेनचा रस्ता असणार आहे. त्याशिवाय नागरिकांना पायी जाण्यासाठी आणि सायकल चालवण्यासाठी वेगळा रस्ता असणार आहे. पुलावर सुरक्षा, वीज आणि आपातकालीन सुविधा या पैलूंवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईची वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. तसेच, पर्यटन आणि स्थानिकांच्या आर्थिकस्थिताला हातभार लागणार आहे.