मुंबई : मुंबईमध्ये शहर आणि उपनगर जिल्ह्यांत सर्व मतदान केंद्रांवर मतदान मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडेल याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
राज्यातील सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानापूर्वी ७२ तासांसाठी प्रमाणित कार्यचालन पद्धत (एस ओ पी) तसेच सुरक्षा व्यवस्था यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठीची कार्यवाही यंत्रणेकडून दोन वेळा पूर्ण झालेली आहे. मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणानंतर त्याविषयी माहिती सुसूत्रीकरणा देण्यासाठी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याकरिता 'आपले मतदान केंद्र जाणून घ्या' अभियान आणि 'मतदार माहिती पावती' (वोटर इन्फॉर्मेशन स्लीप) या दोन्ही माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून संपर्क साधण्यात आला आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी निश्चित किमान सुविधांची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल, यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही, त्यांना निवडणूक यंत्रणेचा चांगला अनुभव येईल, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केला आहे. मतदानापूर्वीच्या ७२ तासांसाठी विहित प्रमाणित कार्यचालन पद्धतीनुसार (एस ओ पी) सर्व कार्यवाही करावी, मतदान सुरळीत व निर्भय वातावरणात पार पडेल, याची सर्व प्रशासकीय दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
पोलिसांचा सुरक्षा आराखडा
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार निवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याबाबतचा आराखडा पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आला. त्याअनुषंगाने मुंबई पोलीस दलामार्फत संगणकीय सादरीकरण करून माहिती सादर करण्यात आली.
मतदारांसाठीच्या सोयीसुविधा
मतदान केंद्राच्या ठिकाणी दिशादर्शक फलक, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, आसनव्यवस्था, रांग व्यवस्थापन इत्यादी सर्व तयारी करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी दिव्यांग मित्र आणि दिव्यांग सहायक अशा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या सुविधेसाठी सुमारे ३ हजार ८०० इतक्या व्हील चेअरदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतदानापूर्वीच्या ७२ तासांसाठी प्रमाणित कार्यचालन पद्धत तसेच सुरक्षा व्यवस्था या संदर्भात गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (पश्चिम उपनगरे), डॉ. अश्विनी जोशी (शहर), डॉ. अमित सैनी (पूर्व उपनगरे), अभिजीत बांगर (प्रकल्प), तसेच अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव (मुंबई शहर), राजेंद्र क्षीरसागर (मुंबई उपनगरे) आणि पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्य नारायण आदी उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक निरीक्षक सत्यप्रकाश टी. एल., हिमांशु गुप्ता, समीर वर्मा, पोनुगुंथला रामजी, कमल किशोर सोन, श्रीमती शिल्पा शिंदे, श्रीमती अंजना एम. इत्यादी यावेळी उपस्थित होते. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचाराची मुदत संपुष्टात येईल.