मुंबई

मुंबईत ३६ ठिकाणी मतमोजणीची जय्यत तयारी; २७०० हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी १० हजार पोलीस तैनात

Maharashtra assembly elections 2024: मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी २७०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी २७०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

बुधवारी मुंबई शहर जिल्ह्यात ५२. ६५, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ५६.३९ टक्के मतदान झाले. शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी एकूण ३६ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. त्या ठिकाणी सुमारे १० हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. विशेष म्हणजे मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्ह्यातील मिळून एकूण ३६ मतदारसंघांसाठी ३६ केंद्रांवर शनिवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ५२.६५ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण १० मतदारसंघांत मिळून एकूण २५ लाख ४३ हजार ६१० मतदार आहेत. यापैकी एकूण १३ लाख ३९ हजार २९९ नागरिकांनी मतदान केले.

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५६.३९ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण २६ मतदारसंघांत मिळून एकूण ७६ लाख ८६ हजार ०९८ मतदार आहेत. यापैकी एकूण ४३ लाख ३४ हजार ५१३ नागरिकांनी मतदान केले. त्यामध्ये ४१ लाख ०१ हजार ४५७ पुरुषांपैकी २३ लाख ५८९ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, एकूण ३५ लाख ८३ हजार ८०३ महिलांपैकी २० लाख ३३ हजार ६५४ महिलांनी मतदान केले. इतर ८३८ मतदारांपैकी २७० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

मतमोजणी केंद्रापासून ३०० मी.पर्यंत गर्दीला बंदी

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होणार आहे. त्यावेळी मतमोजणी केंद्रांवर मोठ्या संख्येने लोक जमण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी मुंबईतील मतमोजणी केंद्रापासून ३०० मीटरपर्यंत गर्दी करण्यास बंदी घातली आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त आणि प्रवक्ते अकबर पठाण यांनी हे आदेश जारी केले आहेत.

मतमोजणीवेळी मोठ्या संख्येने लोक मतमोजणी केंद्रावर येण्याची शक्यता आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सार्वजनिक शांततेचा भंग रोखण्याच्या उद्देशाने हे आदेश देण्यात आले आहेत. अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यास मनाई असल्याचे आदेशात म्हटले आहे.

मुंबई आणि विशेष अधिकार प्राप्त कार्यकारी दंडाधिकारी सुरक्षा संहिता, २०२३, भारतीय नागरी संहितेच्या कलम १६३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत कलम १० अन्वये, निवडणूक अधिकारी किंवा कोणत्याही सार्वजनिक कामात गुंतलेली कोणतीही व्यक्ती, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.०० ते २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रावर किंवा जवळच्या कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला हस्तक्षेप करू शकत नाही.

सकाळी १० वाजेपर्यंत कोणत्याही संस्थेत सामील होणे किंवा फिरणे, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, महामार्गावर, रस्त्याने किंवा कोणत्याही मार्गाने लोकांचा समूह किंवा सभा गोळा करणे, मतमोजणी केंद्रापासून ३०० मीटरच्या परिघात इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

अशी होईल मतमोजणी

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रशासनाने मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यासाठी तयारी केली आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण ३६ मतदारसंघांसाठी ३६ केंद्रांवर शनिवार, दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी, टपाली मतदानांची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची गणना केली जाईल. प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार, निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षेसाठी पोलीस दलासोबत अन्य यंत्रणांचेही मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.

दोन वेळा प्रशिक्षण

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मतमोजणी पारदर्शकपणे आणि सुलभरीत्या व्हावी, या अनुषंगाने मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन वेळा प्रशिक्षण देण्यात येत आहे. दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी यासाठी पहिल्यांदा प्रशिक्षण देण्यात आले. तर, शुक्रवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

स्ट्राँग रूम सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संयंत्रे संबंधित मतदारसंघांच्या स्ट्राँग रूममध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. एकूण ३६ स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) तसेच पोलीस तैनात आहेत. हे सर्व स्ट्राँग रूम सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी