मुंबई : मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे विभाग अधिकारी व पोलीस यंत्रणाही तितकीच जबाबदार असल्याचा घणाघात काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांनी गुरुवारी केला. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन मुंबादेवी मंदिर परिसराचा लवकरात लवकर एकात्मिक विकास करण्याबरोबरच विभागातील सर्व मंदिर, मशीद, गुरुद्वारा, दर्ग्याभोवतालच्या परिसराच्या सुशोभिकरणावर भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
‘नवशक्ति’च्या कार्यालयाला भेट देऊन अमीन पटेल यांनी गुरुवारी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले की, ‘प्रजा संस्थेच्या आमदारांच्या प्रगती अहवालानुसार मी मागील सलग सहा वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा राष्ट्रकुल संसदेचा पुरस्कारही मला मिळाला आहे. माझ्या विभागातील जनतेचे आजवर मला मनापासून पाठबळ मिळत आले आहे. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आमच्या विभागात प्रचारालासुद्धा येण्याची गरज नाही असेही स्थानिक नागरिक आवर्जुन सांगत आहेत. मी माझ्या कार्यालयात चोवीस तास सहज उपलब्ध असल्याने नागरिकांचे प्रश्न समजून ते लवकर सोडविता येतात.
मुंबादेवी मतदारसंघातील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, अनधिकृत बांधकाम रोखण्याचा प्रयत्न दुसरे तिसरे कुणी नव्हे, तर महापालिकेचे विभागीय सहाय्यक आयुक्त हेच करू शकतात. आपल्या विभागातील अनधिकृत बांधकामांचा विषय मी सभागृहात उपस्थित केला असता तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी सांगितले, कारवाई होईल; परंतु प्रत्यक्षात काहीही झालेले नाही.
ते म्हणाले की, ‘महात्मा फुले मार्केटच्या पुनर्विकासाचे काम मार्गी लावण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आता ही मंडई खासगी विकासकांमार्फत नव्हे, तर मुंबई महापालिकेमार्फतच उभारली जात आहे. हे काम वर्षभरात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात शंभर-दीडशे वर्षांच्या जुन्या इमारती आहेत. या विभागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न खूप मोठा आहे. तसेच, सेस इमारतींचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जुन्या इमारतींचा नियोजनबद्ध व एकात्मिक विकास करण्यावर भर दिला जात आहे. आधी कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प व्यवहार्य ठरत नव्हता. त्यासाठी आपण खूप मेहनत घेतली. तब्बल बारा वर्षांनंतर कामाठीपुरा पुनर्विकासाच्या निविदा अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाला लवकरच गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कामाठीपुरा विभागाचे क्षेत्रफळ ३३.६ एकर आहे. या विभागात याआधी जवळपास २२ हजार सेक्स वर्कर्स होते. त्यांची संख्या आता १२०० वर आली आहेत. या विभागात किरकोळ उद्योग सुरू झाले असून ते भाडे जास्त देत असल्याने सेक्स वर्कर्सची संख्या घटली आहे. या विभागात आता त्यांच्या केवळ दोन लेन्स उरल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मी नेहमीच महिलांचा आदरसन्मान करीत आलो आहे. ‘हमारा माल देसी आहे, वो इम्पोर्टेड है’ असे उद्गार खासदार अरविंद सावंत यांनी काढल्याने वाद निर्माण झाला होता. विशेष म्हणजे हा वाद अडीच दिवसांनंतर उकरून काढण्यात आला होता. मुळात सावंत यांनी कुणाचे नाव घेतले नाही वा त्यांचा उद्देश कुणालाही अवमानीत करण्याचाही नव्हता. त्यामुळेच हा वाद फार काळ चालला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.