मुंबई : दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे. या मागण्यांबाबत यापूर्वी उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले.
सह्याद्री अतिथिगृह येथे दुय्यम न्यायालयातील कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधी सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, उच्च न्यायालयाच्या गठित समितीच्या अहवालाच्या शिफारशीवर अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव तसेच वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असतील. या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात येईल.
उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे सबंधित कर्मचाऱ्यांच्या आलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी यापूर्वी दोन न्यायाधीशांची समिती स्थापन केली होती. निर्णय घेण्याआधी शासनातील अन्य विभागात कार्यरत त्याच संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. तसेच या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर येणारा आर्थिक ताण लक्षात घ्यावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक शेखर मुघाटे आदी उपस्थित होते.