गिरीश चित्रे/मुंबई
आजच्या धावपळीच्या जीवनात नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून विविध आजारांना आमंत्रण देत आहेत. त्यापैकी एक आजार म्हणजे उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन). राज्यातील १ कोटी ४८ लाख ४४ हजार ४९९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ५१ लाख ५७ हजार ४२९ जण उच्च रक्तदाबाचे शिकार झाल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. सन २०२४-२५ मध्ये ४१ लाख २८ हजार ९५२ रुग्ण उच्च रक्तदाबाचे आढळले होते. मात्र, यंदा या रुग्णांमध्ये १० लाख २८ हजार ४७७ ने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचा विकास झपाट्याने होत असताना लोकांच्या राहणीमानात बदल होत आहे. त्यात घरची आर्थिक परिस्थिती हाताळणे, कामाचा ताण यामुळे लोकांमध्ये टेन्शन वाढत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तणावमुक्तीसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांकडे वेळ नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने आपणच विविध आजारांना आमंत्रण देतो. त्यापैकी ‘उच्च रक्तदाब’ हा एक आजार आहे. राज्यात उच्च रक्तदाबाचा धोका वाढत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
ताणतणावामुळे वाढतोय ‘उच्च रक्तदाब’
तणाव हा भयानक आजार असून उच्च रक्तदाबामुळे हृदय व किडनीला त्रास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नये, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.
३० ऑक्टोबर २०२५ रोजीची आकडेवारी
तपासणी : १ कोटी ४८ लाख ४४ हजार ४९९
निदान : ५१ लाख ५७ हजार ४२९
उपचारासाठी पाठपुरावा : ८ लाख २१ हजार १४८ (१५.९ टक्के)
उच्च रक्तदाब नियंत्रणात :
६ लाख २५ हजार ७१० (१२.१ टक्के)
वर्ष २०२४-२५
तपासणी : १ कोटी ४३ लाख ३९ हजार ६६५
निदान : ४१ लाख २८ हजार ९५२
उपचारासाठी पाठपुरावा : ७ लाख २९ हजार ३२७ (१७.७ टक्के)
उच्च रक्तदाब नियंत्रणात :
५ लाख ४९ हजार २८७ (१३.३ टक्के)