मुंबई

ज्येष्ठांच्या घरांना ‘महारेरा’चा आधार; गरजा लक्षात घेऊन घरे बांधण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

नवीन घरात त्यांच्या गरजेच्या बाबी असायला हव्यात हे ओळखून ‘महारेरा’ने ही पावले उचलली. हे धोरण बनवणारी ‘महारेरा’ ही देशातील पहिलीच नियामक संस्था ठरली आहे

Swapnil S

द्रौपदी रोहेरा/मुंबई : समाजात वाढणारी ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षात घेऊन शहरी भागात खास घरे उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन घरे बांधण्यासाठी ‘महारेरा’ने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यात ज्येष्ठांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा अंतर्भाव केला आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.

‘महारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता यांनी सांगितले की, सध्याच्या समाजात ज्येष्ठांसाठी घर ही गरज बनली आहे. अनेक विकासक याबाबतचे प्रकल्प बनवत असून त्याची मागणी वाढली आहे. पण, बांधकाम करताना ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेत नाही. त्यातून निवृत्त व ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच ‘महारेरा’ने ज्येष्ठांच्या घरांसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला. अनेक बिल्डरांनी आपल्या घरांची जाहिरात ‘रिटायरमेंट होम्स’ अशी केली. त्यातून ग्राहकांची दिशाभूल होत होती. तसेच अनेक प्रकल्पांमध्ये ज्येष्ठांसाठी असलेल्या घरांमध्ये आवश्यक ते निकषही पाळले गेले नव्हते, असे मेहता म्हणाले.

नवीन घरात त्यांच्या गरजेच्या बाबी असायला हव्यात हे ओळखून ‘महारेरा’ने ही पावले उचलली. हे धोरण बनवणारी ‘महारेरा’ ही देशातील पहिलीच नियामक संस्था ठरली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी झाल्यानंतर विक्री कागदपत्रांमध्ये काही विशिष्ट तरतुदी कराव्या लागतील. तसेच ‘मार्गदर्शक तत्त्वानुसार’ घरे बांधावी लागतील. बि‌ल्डिंगचे डिझाईन, हिरवा भाग, लिफ्ट, रॅम्प्स, जिने, कॉरिडॉर, प्रकाश योजना, हवा, सुरक्षा व सुरक्षितता आदी बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे ते म्हणाले. ‘निवृत्तांच्या घरासाठी नियमन’ हा मसुदा ‘महारेरा’च्या वेबसाइटवर टाकला आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत यासाठी maharera@gmail.com या बेवसाइटवर सूचना मागवल्या आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. प्रत्येक राज्याच्या गृहनिर्माण नियमकांनी आवश्यक ती पावले उचलावीत, असे आदेश दिले आहेत.

या मार्गदर्शक तत्त्वावरील महत्त्वाची अट म्हणजे, एक माळ्यापेक्षा अधिक मजल्याच्या इमारतीत लिफ्ट सक्तीची केली आहे. प्रत्येक लिफ्टमध्ये ऑडिओ-व्हिडीओ यंत्रणा असावी. लिफ्टमध्ये व्हिलचेअरसाठी जागा असावी. पायऱ्यांची रुंदी १५०० मिमीपेक्षा कमी नसावी. पायऱ्यांच्या बाजूला हात धरायला रेलिंग असावे. पायऱ्या १२ पावलांपेक्षा अधिक नसाव्यात, असे म्हटले आहे.

ज्येष्ठांच्या घरांसाठी महत्त्वाच्या सूचना

एक मजल्यापेक्षा जास्त इमारत असल्यास ‘लिफ्ट’ सक्तीची

प्रत्येक लिफ्टमध्ये ऑडिओ-व्हिडीओ यंत्रणा

व्हिलचेअर लिफ्टमध्ये जाऊ शकण्याची सोय

व्हिलचेअरसाठी रॅम्प

दरवाजे ९०० मिमीपेक्षा जास्त

फर्निचर हलके असावे

बिल्डिंगच्या कॉरिडोरमध्ये पायऱ्या नसाव्यात

किचनमध्ये गॅस गळती तपास यंत्रणा बसवावी

बाथरूममध्ये वॉशबेसीन, रेलिंग असावे

बाथरूममध्ये न घसरणाऱ्या टाइल्स असाव्यात

प्रसाधनगृहाचे दार बाहेरून उघडावे

विजेची बॅकअप सुविधा असावी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

‘ऑक्टोबर हिट’ने मुंबईकर घामाघूम! तापमान ३२; पण भास ४१चा... सोशल मीडियावर भावनांचा भडका