मुंबईतील मलाड पूर्व येथील टाइम्स ऑफ इंडिया ब्रिजजवळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर धावत्या खासगी प्रवासी बसला मंगळवारी (दि. २०) सकाळी अचानक भीषण आग लागली. ही घटना मेट्रो लाईन ७ च्या पुलाखाली घडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली.
माहितीनुसार, सकाळी १०.०५ च्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. त्यावेळी बसमध्ये चालकासह एकूण १३ जण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, मेट्रो प्रशासन, वाहतूक पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी १०:३३ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. चालकासह १३ प्रवाशांना वेळेवर सुखरूप बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही, असे मुंबई अग्निशमन दलाने सांगितले.
बस जळून खाक
व्हायरल व्हिडीओमध्ये मेट्रो पुलाखाली पिवळ्या रंगाची बस भीषण आगीत जळून खाक होत असल्याचं दिसतंय. बसमधून मोठ्या प्रमाणात काळ्या धूराचे लोट उठले होते.
आगीचं नेमकं कारण काय?
घटनेमुळे काही वेळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. तथापि, बसला आग कशामुळे लागली याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.