मुंबई : मुंबईत यंदा मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्याने कीटकजन्य आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया व हॅपेटायटिस आजारांच्या रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रो यांच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत नाही.
पावसाळ्यामध्ये दूषित तसेच, गढूळ पाण्यातून प्रादुर्भाव होऊन आरोग्यासंदर्भात अनेक तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन सतत केले जाते. उघड्यावरचे पदार्थ खाणे, पाण्यातून संसर्ग झाल्यामुळे आरोग्याशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे आहे.
यावर्षी मुंबईमध्ये जानेवारीपासून जुलैपर्यंत ४१५१ जणांना मलेरियाचा प्रादुर्भाव झाला असून ११६० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. मागील वर्षात जानेवारी ते जुलै या महिन्यांत मलेरियाच्या रुग्णांची संख्या २८५२ इतकी होती. ९६६ जणांना डेंग्यूची लागण, तर चिकनगुनियामुळे ४६ जणांना त्रास झाला होता. या वर्षातील पहिल्या सात महिन्यांमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊन रुग्णसंख्या २६५ झाल्याची माहिती समोर आली आहे.
दूषित पाणी तसेच उघड्यावरील अन्नसेवनामुळे पोटदुखीचा त्रास बळावलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यावर्षी पहिल्या सात महिन्यांत ५१८२ जणांना गॅस्ट्रो, तर ६१३ जणांना हॅपेटायटिसचा त्रास झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच पावसाळ्यात दरवर्षी गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते. पोटदुखी किंवा अतिसार असा त्रास सुरू झाल्यानंतरही काही रुग्ण आजार अंगावर काढतात, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालिकेकडून शून्य डास उत्पत्ती मोहीम
मनपा व शासकीय रुग्णालय आणि इतर कार्यालयांकडून ‘शून्य डास उत्पत्ती मोहीम’ सुरू करण्यात आलेली आहे. या मोहिमेत मलेरिया, डेंग्यू डास उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक विभाग स्तरावर नियमित पर्यवेक्षकीय पाहणी करून उपाययोजनांचे मॉनिट्रिंग केले जाईल. तसेच व्यापक प्रमाणात मच्छरदाणीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.