मुंबई : भविष्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करणे हा ४०० दशलक्ष लिटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आता या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील २०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यास केंद्र सरकारच्या ‘सीआरझेड’ची मंजुरी मिळाली आहे.
मनोरी येथील निक्षारीक्षण प्रकल्पाला गती मिळणार असून मालाड, गोरेगाव, बोरिवली, दहिसर आणि कांदिवली या भागातील नागरिकांची तहान भागणार आहे. दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवसांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मेरिटाईम बोर्डाची मंजुरी मिळणार असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. भविष्यात हीच लोकसंख्या दोन कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येणार असून स्थायी समिती व सभागृहाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. तर मनोरी येथील समुद्राचे खारे पाणी गोडे करणे प्रकल्पाला आता सीआरझेडची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा तानसा, विहार व तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु मुंबईची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा नि:क्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला होता. अखेर जीव्हीपीआर कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांची मंजुरी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू होते.
प्रकल्पावर साडेतीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित
मनोरी नि:क्षारीकरण प्रकल्पात समुद्रात दोन किमी लांबीचे दोन बोगदे पाणी आणण्यासाठी आणि पाणी सोडण्यासाठी बांधावे लागणार आहेत. या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर असे एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. मनोरी नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी ३ हजार ५२० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.