मुंबई : भविष्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करणे हा ४०० दशलक्ष लिटरचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आता या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यास केंद्र सरकारच्या 'सीआरझेड'ची मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मेरिटाईम बोर्डाचीही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मनोरी येथील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
मुंबईची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात पोहोचली आहे. भविष्यात हीच लोकसंख्या दोन कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यास स्थायी समिती व सभागृहाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. तर मनोरी येथील समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने 'वर्क ऑर्डर' आधीच दिली आहे. पालिकेने 'वर्क ऑर्डर' दिल्यानंतर केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारच्या परवानग्या मिळवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनासह कंत्राटदाराने जोरदार पाठपुरावा सुरू केला होता. अखेर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मेरिटाईम बोर्डाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मनोरी येथील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा तानसा, विहार व तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु मुंबईची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा निःक्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला होता.
पाच वॉर्डाना पाणी मिळणार
प्रकल्प पूर्ण होताच पी-उत्तर मालाड, पी-दक्षिण गोरेगाव, आर-मध्य बोरिवली पश्चिम, आर-उत्तर दहिसर आणि आर-दक्षिण कांदिवली या वॉर्डाना प्रकल्पातून पाणी मिळेल. सध्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई शहर व पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा होतो. मनोरीतील प्रकल्प कार्यन्वित होताच भांडुप संकुलातील या पाच वॉडांच्या वाट्याचे पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे संकुलातील पाणी गरज असेल तेथे वळते करता येणार आहे.
प्रकल्पावर साडेतीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित
मनोरी निः क्षारीकरण प्रकल्पात समुद्रात दोन किमी लांबीचे दोन बोगदे पाणी आणण्यासाठी आणि पाणी सोडण्यासाठी बांधावे लागणार आहेत. या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर असे एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. येत्या चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मनोरी निः क्षारीकरण प्रकल्पासाठी ३ हजार ५२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.