गिरीश चित्रे / मुंबई
मंत्रालयात दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी, मंत्र्यासाठी अपुरी दालन व्यवस्था यावर उपाय म्हणून मंत्रालयासमोर नवीन मंत्रालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी मंत्रालयासमोरील मंत्र्यांचे १० ते १२ बंगले जमीनदोस्त करण्यात येणार असून त्याठिकाणी मंत्रालयासाठी प्रशस्त इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी पी के दास, आबा लांबा आणि राजा आद्री हे तीन आर्किटेक्ट समोर आले आहे. या आठवड्यात तिघे सादरीकरण करणार होते. मात्र ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनात अधिकारी वर्ग व्यस्त असल्याने सादरीकरण अधिवेशनानंतर होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मंत्रालयाच्या कायापालटचा मुहूर्त आता अधिवेशनानंतरच ठरेल.
दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट जवळ १९५५ च्या काळात म्हणजे ७० वर्षांपूर्वी मंत्रालयाची इमारत बांधण्यात आली. सात मजली इमारतीत महाराष्ट्र शासनाचे ६८ विभाग कार्यालये कार्यरत आहेत. सद्यस्थितीत मंत्रालयात १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांसह सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांची दालने मंत्रालयात आहेत. मंत्रालयातील वाढत्या गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अखेर सुरक्षेच्या दृष्टीने फेस डिटेक्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र मंत्रालयातील वाढत्या गर्दीमुळे दस्तुरखुद्द मंत्र्यांना दालन उपलब्ध होत नसल्याने मंत्र्यांची गैरसोय होत आहे. मंत्रालय, अनेक्स इमारत, कर्मचारी वसाहत व मंत्रालय परिसरातील उद्यानाची जागा अशी एकूण ५५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ आहे. मात्र मंत्रालयासमोर नवीन प्रशस्त इमारत बांधण्यासाठी सुमारे आणखी ६० हजार चौरस मीटर जागेची गरज भासणार आहे. यासाठी मंत्रालयासमोरील मंत्र्यांचे बंगले जमीनदोस्त करण्यात येणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेली नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालय या दरम्यान मधून रस्ता जातो. या रस्त्यामुळे वाहनचालकांना नरिमन पॉइंट, चर्चगेट, बधवार पार्क, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी ठिकाणी ये जा करता येते. मात्र मंत्रालयाच्या बांधकामात अडथळा निर्माण होऊ नये आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंत्रालयासमोरील रस्ता भूमिगत करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. मंत्रालयाच्या पुनर्विकासासाठी तीन आर्किटेक्ट यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी सादरीकरण करण्यात येणार आहे. मात्र ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असल्याने सगळेचे कामात गुंतले आहेत. त्यामुळे अधिवेशनानंतर सादरीकरण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी जागेचा शोध
मंत्रालयासमोर १० ते १२ मंत्र्यांचे बंगले आहेत. मंत्र्यांचे बंगले जमीनदोस्त करत त्याठिकाणी मंत्रालयासाठी प्रशस्त इमारत बांधणीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी मुंबईत विशेष करून शहरात जागेचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
असे होणार काम
मंत्रालयासमोरील मंत्र्यांचे बंगले जमीनदोस्त करणार
नवीन प्रशासकीय इमारतीला लागून नवीन प्रशस्त इमारत उभारणार
मंत्रालयासमोरील रस्ता भूमिगत करणार
सोयीसुविधांसह मंत्रालयाची नवीन इमारत हायटेक असणार