दिवाळी अंक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महागाईतही किंमती स्थिर, मराठी दिवाळी अंकांची ११७ वर्षांची परंपरा प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

दिवाळी अंक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महागाईतही किंमती स्थिर, मराठी दिवाळी अंकांची ११७ वर्षांची परंपरा

दिवाळी सणाचा अविभाज्य घटक असलेल्या दिवाळी अंकांची परंपरा सुमारे ११७ वर्षांची आहे. डिजिटल माध्यमे आणि वाचन संस्कृती कमी होत असल्याबद्दल चर्चा सुरू असतानाच दिवाळी अंकांची परंपरा आजही राज्याने जपली आहे.

तेजस वाघमारे

मुंबई : दिवाळी सणाचा अविभाज्य घटक असलेल्या दिवाळी अंकांची परंपरा सुमारे ११७ वर्षांची आहे. डिजिटल माध्यमे आणि वाचन संस्कृती कमी होत असल्याबद्दल चर्चा सुरू असतानाच दिवाळी अंकांची परंपरा आजही राज्याने जपली आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच बाजारात आलेले दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये वाचकांची गर्दी होऊ लागली आहे. महागाईतही दिवाळी अंकांच्या किमती स्थिर असून खरेदीला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

राज्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वात दिवाळी अंकांना मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या अनेक दशकांपासून दिवाळीच्या निमित्ताने विविध विषयांवरील अंक प्रकाशित करण्याची परंपरा आहे. वाचन संस्कृती लोप पावत असल्याची चर्चा सुरू असताना मात्र दरवर्षी दिवाळी अंकांची संख्या वाढत चालल्याचे दिसत आहे. बाजारात दिवाळी अंकांची खरेदी उत्साहात सुरू आहे. महागाईचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होत असताना दिवाळी अंकांच्या किमती मात्र तुलनेने स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.

दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून मराठी साहित्य, संस्कृती, कला आणि वैचारिक अभिव्यक्तीचे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. कथा, कविता, कादंबरी, विनोदी लेख, प्रवासवर्णने, सामाजिक विषय, राजकारण, अर्थकारण अशा विविध विषयांवरील अंक वाचकांसाठी उपलब्ध आहेत. नामवंत लेखक, साहित्यिक आणि नवोदित लेखकांच्या लेखनाला या अंकांमधून व्यासपीठ मिळते. त्यामुळे दिवाळी अंकांची प्रतीक्षा वाचकांना दरवर्षी लागून राहते.

‘यंदा दिवाळी अंकांच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही अंकांच्या किमती कायम आहेत. सध्या दुकानात १३० ते १४० प्रकारचे दिवाळी अंक उपलब्ध असून आणखी १५ ते २० अंक येणे बाकी आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चार अंकांच्या खरेदीवर १० टक्के, चारपेक्षा अधिक अंकांवर १५ टक्के, तर २० पेक्षा अधिक अंकांच्या खरेदीवर २० टक्के सवलत दिली जात आहे. विशेष दिवाळी अंकांचा संच २,०५० रुपयांऐवजी १,५५० रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये विविध अंकांचा समावेश आहे. वाचकांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये ज्योतिष अंकांना मागणी आहे’.
अनिकेत तेंडुलकर - आयडियल दादर
‘मराठी दिवाळी अंकांची परंपरा आजही कायम असून वाचकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी सुमारे ३०० ते ३५० दिवाळी अंक प्रकाशित होतात. विनोदी, रहस्यकथा, प्रवासवर्णन, वैचारिक लेख, कथा आणि कविता अशा विविध साहित्यप्रकारांतील अंकांना स्वतंत्र वाचकवर्ग आहे. वाचकांना त्यांच्या आवडीनुसार अंकांची निवड करता येते. मराठी दिवाळी अंकांची परंपरा ११७ वर्षांहून अधिक जुनी असून अनेक अंकांनी ५० ते ७५ वर्षांचा टप्पा पार केला आहे. काही अंकांची परंपरा तर ८० वर्षांहून अधिक आहे. दिवाळी अंक ही केवळ वाचनाची मेजवानी नसून महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा ठेवा आहे’.
अशोक कोठावळे - मॅजेस्टिक प्रकाशक

ज्योतिषविषयक अंकांना विशेष मागणी

यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये ज्योतिषविषयक अंकांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आगामी वर्षाचे भविष्य, राशिभविष्य, ग्रहमान, ज्योतिषशास्त्रातील विविध विषय याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाचकांमध्ये आहे. त्यामुळे ज्योतिष अंकांकडे वाचकांचा अधिक ओढा असल्याचे चित्र आहे. एकूणच, डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असतानाही छापील दिवाळी अंकांची लोकप्रियता कायम आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीत गावी जाणं महागलं! खासगी बसच्या तिकीट दरांत थेट दुप्पट-तिप्पट वाढ, प्रवासी संतापले

'ते' कायदे आता कालबाह्य - सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्याच्या वेळा ठरवा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

'गोकुळ'साठी डाव! सहकार कायद्यात दुरुस्ती; सरकारकडून पाच सदस्यांची नियुक्ती

फॉर्म ६, घोषणापत्र आता वेगवेगळे