File Photo
File Photo ANI
मुंबई

मराठी शाळांना गळती, दहा वर्षांत ११३ मराठी शाळांना टाळे

गिरीश चित्रे

पालिका शाळांचा दर्जा उंचावत असल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाचे मराठी शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या १० वर्षांत तब्बल ११३ मराठी शाळांना टाळे लागले असून ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर पालिका शाळा सोडण्याची वेळ आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी मराठी शाळांचा टक्का घसरतच आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या नावाखाली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांना मराठी शाळांचा विसर पडला आहे का, असा सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येतो. मात्र, दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात असताना मराठी शाळा बंद होत असल्याचा विसर शिक्षण विभागाला पडला असावा. २०१२-१३ मध्ये ३८५ मराठी शाळा होत्या, तर ८१ हजार २१६ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सन २०१७-१८ मध्ये मराठी शाळांची संख्या ३८५ वरुन थेट ३१४ वर आली, तर विद्यार्थी संख्याही ४२ हजार ५३५ वर आली. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात शंभर टक्के मराठीचा वापर, असा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मराठी शाळांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘‘शून्य विद्यार्थी शाळा झाली तर ती शाळा बंद करण्यात येते. मराठी शाळा वाढीसाठी मिशन अँड मिशन मोहीम सुरू केली असून ४० हजारांहून अधिक नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तसेच मराठी शाळा बंद झाल्या तरी त्या शाळेतील विद्यार्थी पालिकेच्या दुसऱ्या शाळेत पाठवण्यात येतात’’.

- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका

असा घसरला मराठी टक्का

वर्ष - शाळांची संख्या - विद्यार्थी संख्या

२०१२-१३ - ३८५ - ८१,२१६

२०१३-१४ - ३७५ - ६९,३३०

२०१४-१५ - ३६८ - ६३,३३५

२०१५-१६ - ३५० - ५८,६३७

२०१६-१७ - ३२८ - ४७,९४०

२०१७-१८ - ३१४ - ४२,५३५

२०१८-१९ - २८७ - ३६,५१७

२०१९-२० - २८३ - ३५,१८१

२०२०-२१ - २८० - ३३,११४

२०२१-२२ - २७२ - ३४,०१४

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम

४ जूनला ठरणार खरी शिवसेना कोणाची? मतदारराजाचा कौल निर्णायक; मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना आमनेसामने