अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आज मुंबई दौऱ्यावर; एस. जयशंकर यांच्याशी व्यापार, तंत्रज्ञानासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा संग्रहित छायाचित्र
मुंबई

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आज मुंबई दौऱ्यावर; एस. जयशंकर यांच्याशी व्यापार, तंत्रज्ञानासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

Marco Rubio : मुंबईतील नियोजित कार्यक्रमानंतर रुबियो बुधवारी (दि.२१) गुजरातमधील जामनगरला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव कायम असताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आज, मंगळवारी (दि.२०) व्यापारी शिष्टमंडळासह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार असून, व्यापार, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या खनिजांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींसह ऊर्जा पुरवठा आणि अन्नसुरक्षेच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते.

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना वाहणार श्रद्धांजली

मुंबई दौऱ्यादरम्यान मार्को रुबियो २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील स्मारकाला ते भेट देतील. भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधातील सहकार्यालाही या भेटीत महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे.

जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा

मार्को रुबियो आणि एस. जयशंकर यांच्या बैठकीत संरक्षण, सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या खनिजांच्या क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्ष, त्यांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तसेच इंधन, अन्नधान्य आणि खतांच्या पुरवठ्याशी संबंधित आव्हानांवरही चर्चा होऊ शकते.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठा आणि व्यापारी मार्गांची सुरक्षा हे मुद्दे महत्त्वाचे ठरत आहेत. काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजांवरील हल्ले रोखणे आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे कमी करणे यांसारख्या विषयांवरही दोन्ही देशांमध्ये विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

आगामी बहुपक्षीय बैठकांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेतील वरिष्ठ नेत्यांच्या संभाव्य भेटींबाबतही चर्चा होऊ शकते. मनिला येथे होणारी आसियान शिखर परिषद आणि अमेरिकेतील फ्लोरिडा येथे नियोजित जी-२० शिखर परिषद यांकडेही या संदर्भात लक्ष लागले आहे.

'फ्रीडम २५० रिसेप्शन' कार्यक्रमाला उपस्थिती

मुंबई दौऱ्यात रुबियो जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित 'फ्रीडम २५० रिसेप्शन' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्यावर या कार्यक्रमातून भर दिला जाणार आहे.

मुंबईतील नियोजित कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर रुबियो बुधवारी (दि.२१) गुजरातमधील जामनगरला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे.

भारत-अमेरिका व्यापार कराराकडे लक्ष

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या चर्चेलाही या दौऱ्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत दौऱ्यापूर्वी मार्को रुबियो यांनी व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारविषयक चर्चेत पुढे कोणती प्रगती होते, याकडे लक्ष लागले आहे.

मे महिन्यानंतर रुबियो यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी मे महिन्यात नवी दिल्ली येथे एस. जयशंकर यांच्या यजमानपदाखाली झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहिले होते.

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार व ऊर्जा क्षेत्रांतील प्रश्नांसह काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद असले, तरी संरक्षण, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक सहकार्याच्या दृष्टीने दोन्ही देशांचे संबंध महत्त्वाचे आहेत. त्यामुळे रुबियो यांच्या मुंबई दौऱ्यातील चर्चेतून द्विपक्षीय संबंधांना कोणती दिशा मिळते, याकडे राजनैतिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Tiger Shroff Firing : गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांकडून बॉडीगार्ड्स तैनात, हल्ल्याचा तपास सुरू

ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोच्या वृक्षतोडीला उच्च न्यायालयात आव्हान; वृक्षप्राधिकरण स्थापन न करताच परवानग्या दिल्याचा आरोप

Pune : चहा विक्रेत्याने १० परीक्षार्थींना डांबले; NEET पेपरफुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा

पंतप्रधानांचे डीपफेक व्हिडीओ वापरून फसवणूक; सायबर गुन्हे केंद्राचा खबरदारीचा इशारा

दुष्काळातही झेंडूला बहर; ५० ते ६० किलो दर