मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या दिग्गज बॉक्सर मेरी कोम यांनी 'खासदार क्रीडा महोत्सव २०२६-२७' च्या उद्घाटनावेळी आपल्या भाषणातून खेळाडू व उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करताना आयुष्यात फिटनेसचे महत्त्व, सातत्य आणि खऱ्या आयुष्यातील प्रामाणिकपणा यावर त्यांनी विशेष भर दिला.
भाषणाच्या सुरुवातीलाच उपस्थितांशी आत्मीय संवाद साधताना मेरी कोम म्हणाल्या की, "कसं काय तुम्ही" - हे शब्द मला खूप आवडतात. खेळाच्या क्षेत्रातील आपल्या अनुभवाविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "मी सगळ्यांच खेळांना पाठिंबा देते. खेळाडूनी नुसते खेळाला प्राधान्य न देता फिटनेसला ही तितकेच महत्त्व दिले पाहिजे."
जीवनात फिटनेसचे आणि वेळेचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक वयात फिटनेसचे महत्त्व असते. अनेक जण फिटनेसकडे लक्ष देत नाहीत, पण शेवटपर्यंत तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. पुढे जाण्यासाठी फिट राहणे अत्यावश्यक असून, "मी खऱ्या आयुष्यात आहे तशी आहे" आणि "या महोत्सवाला पाठिंबा देण्यासाठी आले आहे," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
ड्रग्जमुक्त भारत मोहीम सुरू
क्रीडा महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या लोकसभा क्षेत्रात दोन क्रीडा संकुल असून या संकुलाच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्रीडा प्रकारांना प्राधान्य देण्याचा व खेळाडूना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहे. खेळाडूंनी खेळाबरोबरच आपल्या फिटनेसवर लक्ष दिले पाहिजे. पंतप्रधान यांनी ड्रग्जमुक्त भारत जी मोहीम सुरू केली आहे, जास्तीत जास्त भर देऊन ती अधिक प्रभावीपणे राबवून देऊ ड्रग्जमुक्त महाराष्ट्र व लोकसभा क्षेत्र करण्याचा आपला संकल्प असल्याचे मत खासदार रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना क्रीडा शपथ खासदार रवींद्र वायकर यांनी दिली. यावेळ खेळाडूंना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट तसेच चषकाचे अनावरण करण्यात आले.
क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन द्यावे!
आंतरराष्ट्रीय आशिया क्लासिक ब्रेचप्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक विजेत्या मानसी नाईक यांनी या क्रीडा प्रकाराला जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. समीर वानखेडे यांनी ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईने त्यापासून दूर राहून आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावे, असे मत व्यक्त केले.