मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, यावेळी महापौरपदाची लॉटरी नेमकी कुणाला लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा महापौरपदासाठी चक्रानुक्रम पद्धतीने नव्हे, तर नव्याने लॉटरी काढण्यात येणार असून ती प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद हे सर्वोच्च मानले जाते. या पदावर विराजमान होण्यासाठी प्रत्येक नगरसेवक उत्सुक असतो. मात्र आरक्षणामुळे अनेकांना ही संधी मिळत नाही. १९९८ पासूनच्या महापौर आरक्षणाचा आढावा घेतल्यास, खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांना पाच वेळा महापौरपदाची संधी मिळाली आहे.
२०१७ आणि २०२० या दोन्ही वेळा महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असतानाही शिवसेनेने खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांना संधी दिली नाही. २०१७ मध्ये दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर आणि २०२० मध्ये किशोरी पेडणेकर हे दोघेही ओबीसी प्रवर्गातून महापौर झाले. २०२० मध्ये खुला प्रवर्ग असतानाही महिला ओबीसी असलेल्या किशोरी पेडणेकर यांची निवड झाल्याने खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.
आतापर्यंत महापौरपदाची लॉटरी चक्रानुक्रमानुसार काढली जात होती. मात्र यावेळी प्रभाग आरक्षणाच्या धर्तीवर नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामुळे महापौरपद नेमके कोणत्या प्रवर्गात जाणार, याचा अंदाज बांधणे सध्या कठीण असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाचे म्हणणे आहे. नव्या लॉटरीमुळे राजकीय पक्षांची धाकधूक वाढली असून, इच्छुकांची गणितेही बदलण्याची शक्यता आहे.
महापौरपदाचे आरक्षण
१९९८ : नंदू साटम (ओबीसी)
१९९९ : हरेश्वर पाटील (सर्वसाधारण)
२००२ : महादेव देवळे (एससी)
२००४ : दत्ता दळवी (सर्वसाधारण)
२००७ : डॉ. शुभा राऊत (ओबीसी महिला)
२००९ : श्रद्धा जाधव (सर्वसाधारण महिला)
२०१२ : सुनील प्रभू (सर्वसाधारण)
२०१४ : स्नेहल आंबेकर (एससी महिला)
२०१७ : विश्वनाथ महाडेश्वर (ओबीसी)
२०२० : किशोरी पेडणेकर (ओबीसी)
मुंबई वगळता अन्य २८ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. मुंबई पालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात चार जागा असतील.