मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. पंरतु गणेशोत्सवानिमित्त या रविवारी (१५ सप्टेंबर) मुख्य मार्गावर ब्लॉक घेण्यात आलेला नाही.
मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/येणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे स्थानकावर अनुक्रमे ५व्या आणि ६व्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक आहे. पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
डाऊन हार्बर मार्गावरील 'या' सेवा बंद
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तर ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेल दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील.