मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित ऑनलाइन संगणकीय सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा व MHADA HOUSING LOTTERY SYSTEM या ॲपचाच वापर करावा, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे आज आयोजित लाईव्ह वेबिनारमध्ये करण्यात आले.
२०३० सदनिकांच्या विक्रीसाठी ९ ऑगस्टपासून म्हाडाचे संकेतस्थळ https:// housing. mhada.gov.in व मोबाइल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. याबाबत मार्गदर्शनासाठी व इच्छुक अर्जदारांच्या शंका निरसनासाठी म्हाडा मुंबई मंडळातर्फे आज आयोजित ऑनलाइन वेबिनार उत्साहात पार पडला. या वेबिनारमध्ये 'म्हाडा'चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोदेले यांनी सोडत अर्ज प्रक्रियेविषयी माहिती दिली व इच्छुक अर्जदारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
बोडके म्हणाल्या की, म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय सोडत प्रणाली तयार केली. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे.