मुंबई

दुबईत अडकलेल्या भारतीयांना दिलासा; मध्यपूर्व तणावानंतर उड्डाणाला सुरुवात, प्रवासी मुंबईत दाखल, Video

मागील काही दिवसांपासून मध्यपूर्वेतील संघर्षामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईसह भारतात येणारे शेकडो प्रवासी दुबईसारख्या ट्रान्झिट केंद्रांवर अडकून पडले होते.

किशोरी घायवट-उबाळे

मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून विस्कळीत झालेल्या हवाई वाहतुकीत आता हळूहळू सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी रात्री (दि.२) छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे दुबईहून आलेले एमिरेट्स (Emirates)चे विमान सुरक्षितपणे उतरले आणि अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

उड्डाण रद्द; शेकडो प्रवासी अडकले

माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून मध्यपूर्वेतील संघर्षामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईसह भारतात येणारे शेकडो प्रवासी दुबईसारख्या ट्रान्झिट केंद्रांवर अडकून पडले होते. सोमवारी रात्रीचे हे आगमन म्हणजे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

'सुरुवातीला तांत्रिक बिघाड वाटला' - प्रवाशांचा अनुभव

दुबईहून मुंबईत परतलेल्या अजय यांनी सांगितले की, ते मूळत: दुबईहून अमेरिकेला जाणार होते. "सुरुवातीला विमान उड्डाण घेत नसल्याने तांत्रिक बिघाड असावा असे वाटले. मात्र सात-आठ तासांनंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली," असे त्यांनी सांगितले. अडकलेल्या प्रवाशांसाठी एमिरेट्सने बस आणि हॉटेलची व्यवस्था केली होती. "मुंबईला जाणारे उड्डाण सुरू होत असल्याचे कळताच आम्ही तातडीने परतण्याचा निर्णय घेतला," असे त्यांनी नमूद केले.

दुबई विमानतळावर मर्यादित उड्डाणे सुरू

दरम्यान, २ मार्चच्या संध्याकाळपासून मर्यादित उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ (Al Maktoum International Airport) येथून काही उड्डाणे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईसह महत्त्वाच्या शहरांशी हवाई संपर्क पुन्हा प्रस्थापित होऊ लागला आहे.

अबू धाबी-बंगळुरू उड्डाणालाही परवानगी

याच पार्श्वभूमीवर अबू धाबीहून पहिले उड्डाण सोमवारी रात्री उशिरा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (Kempegowda International Airport) येथे उतरले. या प्रवाशांनी एतिहाद एरवेझ (Etihad Airways) ने रद्द झालेल्या उड्डाणांनंतर हॉटेल व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

हवाई निर्बंधांमागचे कारण काय?

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यानंतर इराणकडून प्रत्युत्तरादाखल ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्यानंतर अनेक देशांनी आपापले हवाई क्षेत्र मर्यादित केले होते. परिणामी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आणि विशेषत: गल्फ देशांमध्ये हजारो भारतीय प्रवासी अडकून पडले.

पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारण्याची शक्यता

तथापि, आता मात्र उड्डाणे टप्प्याटप्प्याने सुरू होत असून, पुढील काही दिवसांत मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट