भाईंंदर : महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेचा केंद्रबिंदू, भक्तांच्या भावविश्वातील आधारस्तंभ, समतेचा आणि सामाजिक ऐक्याचा मार्गदर्शक असा आपल्या हृदयात वसलेला विठू माऊलींचा दिव्य स्पर्श मीरा-भाईंदर शहराने प्रत्यक्ष अनुभवला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ५१ फुटी श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे अनावरण नवघ तलाव, भाईंदर (पूर्व) येथे भक्तिभावात, हरिनामाच्या गजरात, श्रद्धेने पार पडले.
मीरा-भाईंदरच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा हा दिवस, नगरविकासाच्या नव्या अध्यायाचा आरंभ ठरला आहे. विकासाचा वेग आणि अध्यात्माचा स्पर्श यांचे सुंदर संतुलन साधणाऱ्या मंत्री सरनाईक यांच्या कार्यसंस्कृतीतून शहराला केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर आत्म्याला उभारी देणारी एक नवी ओळख मिळाली आहे.
वारकरी परंपरेवर आधारित आकर्षक बसथांबे, भव्य वारकरी चौक, सुसज्ज वारकरी भवन आणि आता पंचावन्नगुणा दिव्यतेने झळकणारी ५१ फुटी विठ्ठलाची मूर्ती हे सर्व प्रकल्प मंत्री सरनाईक यांच्या दूरदृष्टीचे आणि मीरा-भाईंदरला आध्यात्मिक पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नेण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाचे प्रतीक आहेत.
पंढरीचा विठुराया हा फक्त देव नाही; तो संस्कृती आहे, परंपरा आहे, सर्वांचा सखासोबती आहे. त्या विठू माऊलीचे आशीर्वाद आपल्या शहरावर अखंड राहावेत, विकासासोबत अध्यात्म हेही मीरा-भाईंदरचे वैशिष्ट्य बनावे, हीच माझी भावना. ठाण्याप्रमाणेच मीरा-भाईंदरमध्ये ५१ फुटी विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे. शहराचा विकास फक्त रस्ते–इमारतींमध्ये नसतो; तो लोकांच्या श्रद्धा, संस्कृती आणि आत्म्यात असतो.प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
पंढरपूरच्या विठ्ठलाविषयीची अपार भक्ती आपल्या शहरातही जिवंत राहावी आणि मीरा-भाईंदरला विकासाबरोबरच अध्यात्मिक स्थैर्याची नवी ओळख मिळावी, यासाठी हा सोहळा शहरात राबवण्यात आल्याचे देखील परिवहन मंत्री सरनाईक यांनी म्हटले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत, टाळ-चिपळ्यांच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि दिव्य रोषणाईत उजळून निघालेला हा सोहळा मीरा-भाईंदरच्या इतिहासातील एक अतुलनीय भक्तिमहोत्सव म्हणून कायम स्मरणात राहणार आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.