Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क खाडीकिनारी खोदलेल्या कृत्रिम तलावातील गणेश मूर्तींवर चक्क जेसीबीने माती टाकून बुझवण्याचे काम केल्या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अन्य लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क खाडीकिनारी खोदलेल्या कृत्रिम तलावातील गणेश मूर्तींवर चक्क जेसीबीने माती टाकून बुझवण्याचे काम केल्या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अन्य लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जेसलपार्क खाडीकिनारा हा कांदळवन क्षेत्र असताना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे सर्रास उल्लंघन आणि अपमान करून मीरा-भाईंदर महापालिकेने कांदळवन आणि सीआरझेड क्षेत्रात बेकायदा उत्खनन करत ४ कृत्रिम तलाव बांधले. या प्रकरणी शासनाच्या वन विभागाने पाहणी करून पालिकेने उल्लंघन केल्याचा अहवाल दिला.

या शिवाय शासनाच्या नगरविकास विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अपर तहसीलदार कार्यलय यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये व त्याचे काटेकोर पालन करण्यास सांगितले. मात्र तरी देखील महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, प्रभारी शहर अभियंता दीपक खांबित सह अन्य संबंधित अधिकारी यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून उल्लंघन सुरूच ठेवले.

रविवारी तर येथील कृत्रिम तलाव मधील पाणी पंप ने काढून थेट कांदळवन क्षेत्र परिसरात बेकायदा सोडण्यात आले.शासन आदेश नुसार कृत्रिम तलावातील पाणी जल शुद्धीकरण केंद्रात नेऊन प्रक्रिया करून मग सोडण्याचे आदेश होते. त्याचे उल्लंघन पालिकेने केले.

इतकेच नव्हे, तर पाणी उपसून झाल्यावर आत असलेल्या मूर्तींवर जेसीबीच्या सहाय्याने माती टाकली जात होती. हा प्रकार बाबू पाटील या तरुणाने पाहिल्यानंतर त्यांनी हेमंत सावंत आदींना कॉल करून कळवले. सावंत यांच्यासह सचिन पोपळे, राहुल तिवारी, रमाकांत माळी, अनुदीप पोटले आदी घटनास्थळी गेले.

त्यावेळी तेथे पालिकेच्या विद्युत विभागाचे अभियंता प्रशांत जानकर हे हजर होते. विसर्जन आणि कांदळवन बाबत शासनाच्या व न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन कशाला करत आहात असा सवाल जानकर यांना केला. त्यावर जानकर हे त्यांच्या अंगावर धावून गेले आणि अरेरावी व दमदाटीच्या भाषेत आम्हाला काय करायचे ते करणार, तुम्हाला काय करायचे ते करा? असे बोलले.

उपस्थितांनी पोलिसांना कॉल केला असता काही वेळात जानकर, जेसीबी आदी सर्व पळून गेले. नवघर पोलीस घटनास्थळी आले असता त्यांनी आधी तक्रार अर्ज द्या असे सांगितले. त्यावर अर्ज नाही गुन्हा नोंदवा अशी भूमिका उपस्थितांनी मांडल्या नंतर अखेर हेमंत सावंत यांची फिर्याद घेऊन जानकर सह संबंधित कामगार, जेसीबी व दोन जनरेटर गाड्या, पंप आदींचा उल्लेख करून नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

ह्या प्रकाराने महापालिका आणि सत्ताधारी यांच्या विरोधात टीका आणि आरोप होत असून गणेशमूर्तींची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्या व तेढ तणाव निर्माण केल्याचा आरोप पालिका आणि सत्ताधारी यांच्यावर होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आम्ही कुणाही पक्षात सहभागी होणार नाही; शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा

भिवंडी : भाजपच्या माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; सामूहिक अत्याचार प्रकरणी अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

Pune : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरात घुसखोरी; घुसखोर तरुणाला अटक

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रे यांचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द; ३ दिवसांत शरण येण्याचे दिले आदेश