भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमुळे उद्भवणारा दुर्घटनांचा धोका लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील अशा इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या सद्यस्थितीची पडताळणी करण्यासाठी लवकरच विशेष पथक स्थापन करणार आहे तसेच आतापर्यंत संबंधित इमारतींना बजावण्यात आलेल्या नोटिसांनंतर काय कार्यवाही झाली, याचाही आढावा घेतला जाणार आहे.
मीरा-भाईंदर शहरात ३० वर्षांहून अधिक जुन्या तसेच जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. विशेष पथकाच्या माध्यमातून इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित सोसायट्यांना स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात संरचनात्मक तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या नोटिसा बजावल्या जातात. मात्र, अनेक ठिकाणी नोटिसा मिळूनही सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून संरचनात्मक तपासणी केली जात नसल्याचे, तर काही ठिकाणी तपासणी करूनही अहवाल पालिकेकडे सादर केला जात नसल्याचे निदर्शनास येते. तर नोटीसा बजावून महापालिका अधिकारी अर्थपूर्ण लागेबांधे जपत दुर्लक्ष करतात. जेणे करुन दुर्घटना होऊन अनेकांचे जीव गेले आहेत तर अनेकांचे नुकसान झाले आहे.
विशेष पथक प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करणार
काही इमारतींमधील रहिवासी आवश्यक ती दुरुस्ती करण्यास किंवा धोकादायक परिस्थितीत घरे रिकामी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागांच्या निर्देशानुसार विशेष पथक प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन परिस्थितीची पडताळणी करणार आहे.
आढावा घेणार
विशेष पथकाकडून अतिधोकादायक सी-१ श्रेणीतील इमारतींसह दुरुस्तीयोग्य सी-२ आणि सी-३ श्रेणीतील इमारतींचीही सद्यस्थिती तपासली जाणार आहे. संबंधित इमारतींची सुरक्षितता, तपासणीचे अहवाल व दुरुस्तीबाबत झालेली कार्यवाही यांची पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय किती इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यापैकी किती इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले आहे, किती ठिकाणी अहवाल सादर करण्यात आले आहेत, किती इमारतींमध्ये दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत, याची माहिती संकलित करून आढावा घेतला जाणार आहे.
'ती' घरे रिकामी करणार
अत्यंत जीर्ण आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यकतेनुसार रहिवाशांना घरे रिकामी करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आठवण पालिकेला आली आहे.