भाईंंदर : वनमंत्री गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे भाजपाचे संपर्कमंत्री असले तरीही मीरा-भाईंदरमध्ये मात्र ते जनता दरबार घेत नव्हते. मात्र महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना शह देण्यासह मीरा-भाईंदर भाजपाला बळ देण्यासाठी मंत्री नाईक हे मीरा भाईंदरच्या मैदानात उतरले आहेत.
मीरा-भाईंदर मधील उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती वर्ग हा प्रामुख्याने भाजपाचा हक्काचा मतदार आहे. २०१७ मध्ये पॅनल पद्धतीचा भाजपाला मोठा फायदा झाला व ६१ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी पालिकेत एकहाती सत्ता व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना आणि सरनाईक यांची कोंडी केली होती.
त्यामुळे यंदा पण भाजपाला मीरा-भाईंदरमध्ये एकहाती सत्ता राखायची आहे. तर शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोर्चेबांधणी चालवली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मविआच्या काळात आणि नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरनाईक यांनी मीरा-भाईंदरसाठी निधी व कामे मंजूर करून घेतली आहेत. सूर्या पाणी पुरवठा योजना, मेट्रो काम मार्गी लावतानाच मेट्रो खाली तीन उड्डाणपूल करून घेतले. अनेक समाज भवन व कामांची लोकार्पण केली आहेत.
मंत्री झाल्यानंतर सरनाईक यांनी शहरातील ताकद वाढवण्यावर भर दिला असून भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना सरनाईक यांच्याशी एकहाती लढा देणे सोपे राहिलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्वाचे नगरविकास खाते आहे.
सत्ता राखण्यावरून मंत्री सरनाईक व आ. मेहता यांच्यात एकमेकांवर गंभीर स्वरूपांची टीका सुरू आहे. मीरा-भाईंदर भाजपाला बळ देण्यासाठी भाजपा नेतृत्वाने आता वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांना मैदानात उतरवले आहे.
येत्या मनपा निवडणुकीत मंत्री सरनाईकांना रोखण्यासह भाजपाचा हा गड एकहाती टिकवून ठेवण्यासाठी नरेंद्र मेहतांवर भिस्त ठेऊन चालणार नसल्याने आता नाईक यांना मीरा-भाईंदरच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे. मीरारोडच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात मंत्री नाईक यांचा जनता दरबार झाला. त्या नंतर त्यांनी पालिका जागेत होत असलेल्या आगरी समाज भवनात आगरी समाजाच्या पदाधिकारी व गावातील अनेकांशी संवाद साधला. आ. मेहताही त्यावेळी उपस्थित होते. मंत्री नाईक यांच्या जनता दरबार व अन्य बैठका, भेटी मुळे मीरा-भाईंदर भाजपात उत्साह निर्माण झाला आहे. नाईक यांच्या जनता दरबार मुळे विविध शासकीय विभागातील अधिकारी, पालिका अधिकारी यांना एकाच ठिकाणी आणून शहरात भाजपाच्या स्थानिकांचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.