Mira-Bhayandar: लता मंगेशकर संगीत विद्यालयावर भाजपचा वरवंटा; जागेचा वापर महापौर निवासासाठी करण्याचा निर्णय 
मुंबई

Mira-Bhayandar: लता मंगेशकर संगीत विद्यालयावर भाजपचा वरवंटा; जागेचा वापर महापौर निवासासाठी करण्याचा निर्णय

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने मीरारोड येथे उभारण्यात येत असलेल्या संगीत विद्यालयाचे स्वप्न आता धुळीस मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

प्रतिनिधी

धीरज परब

भाईंंदर : भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने मीरारोड येथे उभारण्यात येत असलेल्या संगीत विद्यालयाचे स्वप्न आता धुळीस मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २५ कोटी रुपये खर्चाच्या आणि ७० टक्के काम पूर्ण झालेल्या संगीत विद्यालयाची इमारत आता महापौर निवासात रूपांतरित करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. या संदर्भातील ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाला तीव्र विरोध करून संताप व्यक्त केला असून, हा प्रकार संगीत आणि कला प्रेमींचा तसेच मंगेशकर कुटुंबीयांच्या भावनांचा अपमान असल्याची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात १७ जून २०२२ रोजी सर्वात प्रथम लता दिदींच्या नावाने ५ कोटी निधी मंजूर केला होता. त्यात आत सत्ताधारी भाजपच्या आडमुठ्या धोरणामुळे महापौर निवासासाठी संगीत विद्यालयाचा बळी देण्याचा प्रकार समोर आला आहे.

सरनाईक यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

मात्र, एवढी मोठी आर्थिक गुंतवणूक आणि कामाची प्रगती झालेली असतानाही या इमारतीचा मूळ उद्देश बदलून तेथे महापौर निवास उभारण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या महासभेत यासंदर्भातील ठराव मंजूर झाल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीत दिली. ही माहिती मिळताच सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दुसऱ्या महापौर निवासाची गरज काय?

शहरात यापूर्वीच महापौर निवास उपलब्ध असताना दुसऱ्या महापौर निवासाची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी गांभीर्याने लक्ष घालून निर्णयाचा फेरविचार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, सत्ताधारी भाजपच्या निर्णयाचे समर्थन करताना उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी सध्याच्या महापौर निवासाचे क्षेत्रफळ कमी असल्याचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे संगीत विद्यालयासाठी प्रस्तावित असलेली इमारत महापौर भवनात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याचे निवासस्थान दिलेय भाड्याने

कनाकिया पार्क परिसरात महापौर निवास यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. महापौर निर्मला सावले वगळता १९ वर्षांच्या कालावधीत अन्य कोणत्याही महापौरांनी तेथे निवास केलेला नाही. सध्या हे निवासस्थान महापालिकेच्या सा. बां. विभागामार्फत एका खासगी प्रशिक्षण संस्थेला भाड्याने देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संगीत विद्यालयाचा प्रकल्प कायम ठेवण्याची मागणी जोर धरू लागण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाचे तीन वर्षांपूर्वी झाले भूमिपूजन

मीरारोड येथील क्वीन्स पार्क परिसरात, सेव्हन इलेव्हन शाळेजवळील महापालिकेच्या मैदानातील आरक्षण क्रमांक २४६ च्या जागेवर भारतरत्न स्व. लता मंगेशकर संगीत गुरुकुल उभारण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचे सुमारे तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या प्रकल्पासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या इमारतीचे जवळपास ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तू..तू..मैं..मैं.. सुरूच; भाजप-शिंदेसेनेतील वाद चिघळला

६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

‘समृद्धी’ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न; वाशिममध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन, पोलिसांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांना रोखले

पालघर : ‘वाढवण’विरोधात जनआक्रोश; बंदर रद्द होईपर्यंत माघार नाही, आ. निकोले यांचा इशारा

IDBI विक्रीवरून गदारोळ; राहुल गांधी यांचा हल्लाबोल