मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा २४ तास बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन 
मुंबई

मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा २४ तास बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

मीरा रोड आणि भाईंदरमध्ये STEM प्राधिकरणाच्या दुरुस्ती कामांमुळे ११ ते १२ एप्रिलदरम्यान २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असून नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मीरा रोड आणि भाईंदर परिसरातील नागरिकांना येत्या वीकेंडला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. स्टेम (STEM) प्राधिकरणाकडून अत्यावश्यक दुरुस्ती आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार असल्याने २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

कधीपर्यंत पाणीपुरवठा बंद?

महापालिकेच्या अधिकृत MBMConline या पेजवर दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते रविवार दि. १२ एप्रिल सकाळी ९ वाजेपर्यंत STEM प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

MIDCचा पुरवठा सुरू

STEMचा पुरवठा बंद असला तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडून होणारा पाणीपुरवठा नियमित सुरू राहणार आहे. मात्र शहरातील मोठा पाणीपुरवठा STEMमार्फत होत असल्याने अनेक भागांत पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही भागांत विलंब आणि कमी पुरवठा

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड आणि भाईंदरमधील काही भागांत पाणीपुरवठा उशिरा होणे किंवा मर्यादित प्रमाणात होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या भागांत आधीच ठराविक वेळेनुसार किंवा मर्यादित पाणीपुरवठा होतो, त्या भागांवर अधिक परिणाम होऊ शकतो.

नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आधीच पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या दुरुस्ती कामांना सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

दीर्घकालीन सुधारणा अपेक्षित

ही तात्पुरती बंदी अत्यावश्यक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. या कामांमुळे भविष्यात पाणीपुरवठ्याची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

Ganeshotsav 2026 : गणपती दर्शनाला ठाण्यात जाताय? 'या' मंडळांना नक्की भेट द्या

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण