मुंबई : बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर यांना मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणाऱ्या ॲक्सेस - कंट्रोल्ड महामार्गाच्या प्राथमिक संरेखन अहवालाला एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
प्रकल्पासाठी १० हजार ८३३ कोटी खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या शहरांमधून मुंबईत येण्यास लागणाऱ्या प्रवासाच्या वेळात ६० मिनिटांची तर नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. तसेच हा महामार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एनएआयएनएशी कनेक्टिव्हिटी करून देण्याबरोबरच ठाणे आणि जवळपासच्या महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करणार आहे.
एमएमआरडीएची प्राधिकरण बैठक मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत बॅकबे रिक्लेमेशनसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी विकास आराखड्यांचे पुनरावलोकन करण्यावर भर देण्यासोबतच मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वृद्धी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.