मुंबई : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील रेडिओ क्लब येथे नव्या प्रवासी आणि पर्यटन जेट्टीच्या बांधकामासाठी माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने सर्वात कमी रकमेची बोली लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
मोडर्न इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने १४ जुलै रोजी उघडण्यात आलेल्या आर्थिक बोलीमध्ये अंदाजित खर्चापेक्षा ४.४१ टक्के कमी, म्हणजेच २०४.९९ कोटी रुपयांची बोली सादर केली आहे. हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळापुढे ठेवला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाचे आदेश जारी केले जातील. कामाचे आदेश मिळाल्यापासून कंत्राटदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी दिला जाईल.
या जेट्टी प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून २२९.२८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहभागाने हा प्रकल्प राबवला जात आहे. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे आणि व्यग्र जलवाहतूक केंद्र असून तेथील प्रवासी व पर्यटन पायाभूत सुविधा वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सध्या गेटवे ऑफ इंडिया येथील पाच जेट्टींवरून घारापुरी (एलिफंटा गुहा), मांडवा, जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि हार्बर क्रूझसाठी फेरी सेवा चालवल्या जातात.
ताण कमी होणार
सध्याच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने येथे मोठी गर्दी होते. याचा नाहक त्रास प्रवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांगांना सहन करावा लागतो. नवी जेट्टी उभारल्यामुळे सध्याच्या जेट्टींवरील ताण कमी होईल, तसेच प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर रीतीने बोटीत चढण्या-उतरण्याची सुविधा मिळेल. याशिवाय जलवाहतुकीची कार्यक्षमता वाढून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकल्पात कोणत्या सुविधा
प्रस्तावित पायाभूत सुविधांमध्ये ८० मीटर बाय ८० मीटरचा टर्मिनल प्लॅटफॉर्म, आधुनिक टर्मिनल इमारत, २१४ मीटर लांबीचा पोहोच मार्ग, १० बोटींसाठी बर्थिंग जेट्टी, भव्य प्रतीक्षागृह, सुरक्षा तपासणी यंत्रणा, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्निसुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आणि लँडस्केप हरित क्षेत्र आदी सुविधा आहेत.