मुंबई

गोखले पुलाच्या कामांत आव्हानांचा डोंगर ;शुक्रवारी पालिका मुख्यालयात तातडीची बैठक

गोखले पुलाच्या कामांत अवाढव्य गर्डर स्थापन करण्याची सगळी कामे पालिका आणि रेल्वेच्या समन्वयातून पार पडावीत.

नवशक्ती Web Desk

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या कामांत गर्डर टाकण्यासह अनेक आव्हाने आहेत. मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी गोखले पुलाची पहाणी केली. गोखले पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे पालिकेचे नियोजन असून, अडथळे दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वे, पालिकेच्या पूल विभागातील अधिकारी यांची तातडीची बैठक पालिका मुख्यालयात शुक्रवारी आयोजित केली आहे.

अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पात सुमारे १,३०० टन वजनाच्या पहिल्या गर्डरची जोडणी पूर्ण झाली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे २५ मीटर उंचीवर सुट्या भागांची जोडणी करून आता हा गर्डर तयार झाला आहे. त्यास रेल्वे रूळ मार्गावर १०० मीटर अंतर पुढे नेणे, त्यानंतर उत्तरेला सुमारे साडे तेरा मीटर सरकवणे आणि नंतर सुमारे साडेसात मीटर अंतर खाली आणणे, ही अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानाची कामे पार पाडावी लागणार आहेत. गर्डरचे वजन, त्याला स्थापन करण्याचे अंतर हे लक्षात घेता, रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधत वेळापत्रकाप्रमाणे कामे पार पाडणे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

गोखले पुलाच्या कामांत अवाढव्य गर्डर स्थापन करण्याची सगळी कामे पालिका आणि रेल्वेच्या समन्वयातून पार पडावीत. गर्डर स्थापन करताना कोणताही अडसर येवू नये, यासाठी शुक्रवार, २७ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात येईल. या बैठकीमध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, संबंधित रेल्वे अधिकारी, महापालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यासह स्थानिक आमदार अमीत साटम उपस्थित असणार आहेत.

पालिका आयुक्त ग्राऊंड झीरोवर

आयुक्तांनी सोमवारी केलेल्या पाहणी दौऱ्यात आमदार अमीत साटम, सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे, के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान आणि रेल्वे प्रशासन व महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव