मुकेश अंबानी भावूक; मुलांच्या हाती नेतृत्व धुरा... 
मुंबई

मुकेश अंबानी भावूक; मुलांच्या हाती नेतृत्व धुरा...

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या शेअर बाजारातील नोंदणी समारंभात मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी उभारलेल्या डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने देशातील कनेक्टिव्हिटी क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले आहे.

Swapnil S

मुंबई : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या शेअर बाजारातील नोंदणी समारंभात मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी उभारलेल्या डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने देशातील कनेक्टिव्हिटी क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले आहे. आता या कंपनीची धुरा पुढील पिढीकडे सोपवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे भावनिक दर्शन या प्रसंगी घडले. भारतातील सर्वांत मोठ्या कॉर्पोरेट साम्राज्यांपैकी एकाचा वारसा पुढे नेण्यासाठी अंबानी कुटुंबातील पुढील पिढी सज्ज होत असल्याचे या क्षणातून स्पष्ट झाले.

६९ वर्षीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांच्यासह राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) हा सोहळा पाहिला. त्यांची मुले आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांनी यावेळी वडील मुकेश अंबानी आणि आजोबा धीरूभाई अंबानी यांना आदरांजली वाहिली. तसेच कुटुंबाचा वारसा अधिक पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

...ही तर नवी सुरुवात - आकाश अंबानी

जिओ प्लॅटफॉर्म्सची शेअर बाजारातील नोंदणी हा आमच्या प्रवासाचा अंतिम टप्पा नसून नवी सुरुवात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारतीयाला क्षमता विकसित करण्यासाठी सक्षम करणे, हे आगामी दशकातील जिओचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात केले. जिओ प्लॅटफॉर्म्सची शेअर बाजारात नोंदणी झालेल्या दिवशी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये आकाश अंबानी यांनी कंपनीने तंत्रज्ञानातील परिवर्तनाच्या पुढील लाटेचे नेतृत्व करण्याची गरज व्यक्त केली. कनेक्टिव्हिटीपासून डिजिटल सेवांपर्यंत तंत्रज्ञानातील परिवर्तनाच्या पुढील लाटेचे नेतृत्व आपण पुन्हा केले पाहिजे, असे ते म्हणाले.

अनुभव जबाबदारीची जाणीव करून - अनंत

आकाश यांच्यापूर्वी अनंत अंबानी म्हणाले की, जिओची संकल्पना ईशा यांनी मांडली होती आणि त्यानंतर त्यांचे जुळे भाऊ आकाश यांनी ती स्वीकारून विकसित केली. हा अनुभव अत्यंत नम्र करणारा आणि मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे ते म्हणाले. यशाचे मोजमाप खुल्या केलेल्या संधींवरून केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

भागधारकांसाठी मूल्यनिर्मितीचा संकल्प - ईशा

ईशा अंबानी यांनी सांगितले की, आकाश यांनी गेल्या १३ वर्षांपासून जिओच्या उभारणीसाठी आणि विस्तारासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. आज ५३ कोटींहून अधिक ग्राहकांसह जिओ ही भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार सेवा कंपनी बनली आहे. आजोबा धीरूभाई अंबानी यांच्या 'विकास म्हणजे जीवन' या विचाराचा उल्लेख करत ईशा यांनीही कंपनीची उभारणी आणि विस्तार सुरू ठेवण्याचा तसेच सर्व भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती करण्याचा संकल्प व्यक्त केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश

Thane : प्रदीप पूर्णेकर हत्या; महिन्यानंतरही कारण अस्पष्ट, सीसीटीव्ही चित्रफितीची न्यायवैद्यक तपासणी सुरू

ठाणे-घोडबंदर ठप्प! पूर्णेकर हत्या प्रकरणाचे पडसाद; सात ते आठ तास वाहतुकीचा खोळंबा

महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

Mumbai : ९.१५ मीटरचा रस्ता गायब? महिनाभरात हरकती-सूचना नोंदवण्याचे आवाहन