मुंबईत १७४ इमारती अतिधोकादायक; BMCच्या २३, तर खासगी १४१ इमारती सी-वन श्रेणीत 
मुंबई

मुंबईत १७४ इमारती अतिधोकादायक; BMCच्या २३, तर खासगी १४१ इमारती सी-वन श्रेणीत

मुंबईत आजही ब्रिटीशकालीन इमारती असून इमारतींची सद्यस्थिती काय यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते.

Swapnil S

मुंबई : मुंबईत आजही ब्रिटीशकालीन इमारती असून इमारतींची सद्यस्थिती काय यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते. यंदाच्या सर्वेक्षणातून १७४ अतिधोकादायक इमारती असल्याचे निदर्शनास आले आहे. यात एच पश्चिम विभागात २२ तर के पश्चिम विभागात १८ अतिधोकादायक इमारती असल्याची माहिती समोर आली आहे. १७४ पैकी ७२ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून ७१ इमारतींचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. १७४ पैकी मुंबई महापालिकेच्या २३, खासगी १४१, तर सरकारी व म्हाडाच्या १० इमारती सी वन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यापूर्वी जोरदार पावसात अशा अतिधोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. अनेक रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास टाळाटाळ करतात. काहीजण  न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्यासाठी धाव घेत असल्याने अशा इमारती त्याच स्थितीत राहतात. या संदर्भात दीर्घकालीन योजना तयार करणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

२४९ ठिकाणी दरडीचा धोका! 

भांडुप, विक्रोळी, कुर्ला पूर्व, साकीनाका आदी ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो. मुंबईत एकूण २४९ ठिकाणी दरड कोसळण्याची ठिकाणं असून म्हाडाच्या माध्यमातून ९६ ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची कार्यवाही सुरु आहे. तर यापूर्वी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीची आताची स्थिती काय, लोकांना स्थलांतरित करणे यासाठी नियमावली तयार करण्यात यावी, असे आदेश सहायक आयुक्तांना दिल्याचेही भिडे यांनी सांगितले. 

या विभागात सर्वाधिक सी वन इमारती 

डी वॉर्ड ८, जी नार्थ - ८, एच पश्चिम - २२, के पश्चिम - १८, के पूर्व  - ११, कुर्ला - ८, घाटकोपर - ११, पी नार्थ - ११, पी साऊथ - ८, आर सेंट्रल - ९

सी वन इमारती सर्वाधिक कमी या विभागात 

बी विभाग - १, सी विभाग - १, एम पश्चिम - १, ए वॉर्ड - ३, भांडुप - ४, मुलुंड - ४ 

अशी केली जाते इमारतींची श्रेणी

मुंबईतील जुन्या इमारतींचा सर्व्हे केला जातो. त्यात सी-१, सी -२ आणि सी-३ अशी कॅटेगरी केली जाते. सी-१ मध्ये आलेल्या इमारती अतिधोकादायक मानल्या जातात. सी-२ यादीत असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरला दुरुस्तीची गरज असते, तर सी-३ इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. नियमानुसार रहिवाशांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे  आदेश प्रशासन देते.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग